आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Congress And Ncp Issue At Solapur, Divya Marathi

राष्ट्रवादी शिथिल, महायुतीची कसरत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रचारासाठी चार दिवस शिल्लक असल्याने सर्वच उमेदवारांनी प्रचार सभा, गावभेटींवर जोर लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांच्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्वच नेते एकत्र आले असले तरी गावपातळीवर कार्यकर्ते, बूथ यंत्रणा गतिमान झालेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्यासाठी गावपातळीवर कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत. मात्र, बूथ यंत्रणा उभारण्याची कसरत करावी लागत आहे. अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते, आम आदमी पक्षाच्या अँड. सविता शिंदे, बहुजन मुक्ती मोर्चाचे उमेदवार अँड. सुभाष पाटील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

माढय़ासाठी 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 15 एप्रिल रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. तत्पूर्वी सर्वच पक्षांकडून बूथ यंत्रणा कामाला लावली जात आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेकापचे गावपातळीवर चांगले नेटवर्क आहे. मात्र, सर्वच मंडळी ‘रामभरोसे’ दिसत आहेत. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे, परंतु बूथ यंत्रणा लावताना त्यांची दमछाक होत आहे. हीच परिस्थिती प्रतापसिंह मोहिते यांच्याबाबतीत आहे. आम आदमी पक्षासह इतर नेत्यांना फारच कमी प्रमाणात कार्यकर्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे ते नेमकी किती मते घेणार याकडे लक्ष आहे.

ऊसदर, पाणी प्रश्नाचा जोर
गेल्या 15 दिवसांतील प्रचारसभांमध्ये ऊसदर, साखर कारखान्यांना केंद्राकडून मिळालेले अनुदान, दुष्काळी परिस्थितीत मिळालेले मोफत पशुखाद्य, चारा छावण्या, पाणीप्रश्न आदी विषयांवर खल झाला. केंद्राने साखर कारखान्यांना दिलेले अनुदान पोहोचल्याने काही कारखान्यांकडून ऊसदर जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा दर शरद पवार यांच्यामुळेच मिळाल्याचे सांगितले तर स्वाभिमानीने हा दर आमच्या आंदोलनामुळे मिळाल्याचे स्पष्टीकरण दिले. साखर कारखानदार विरुद्ध शेतकरी असे या लढय़ाला स्वरूप देण्याचाही प्रयत्न झाला. स्वाभिमानीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या राजकीय कसरतींवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार हल्ले चढवले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे कारखानदारी बंद पडेल, असा इशाराही दिला. त्यावरही बराच खल झाला.