आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Election Issue At Solapur, Divya Marathi

बहुरंगी लढतीमुळे आता मतविभागणीचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, मुख्य सामना काँग्रेसचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे विरुद्ध भाजपचे अँड.शरद बनसोडे यांच्यातच राहणार आहे. या वेळी पक्षाचे सहा आणि दहा अपक्ष उमेदवार रिंगणात राहिल्याने मतविभागणीचे गणित पाहता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे, तर शिवसेना सोबत नाही, पक्षाचे स्थानिक नेतेही नाहीत. ‘टीमवर्क’चा अभाव असल्याने बनसोडेंसमोर ‘यंत्रणा’ लावायची कशी यावर कसरत करावी लागत आहे.
गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी शिंदे व बनसोडे आमने-सामने आहेत. गेल्यावेळी बनसोडे यांनी निवडणुकीत उतरण्यापूर्वी वर्ष, दीड वर्ष अगोदरच तयारी सुरू केली होती. या वेळी निवडणुकीची घोषणा होईपर्यंतही लढायचे की नाही, या संभ्रमात होते. तर दुसरीकडे शिंदे यांनी कृतज्ञता मेळावे घेऊन वातावरण काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न केला. त्या तुलनेत बनसोडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही आणि आता प्रचारातही भाजपातील स्थानिक नेत्यांची सक्रियता दिसून येत नसल्याचेच चित्र आहे. निवडणूक प्रमुख कोण, याचाही तेढ निर्माण झाली होती, अशी चर्चा आहे. त्यात ग्रामीण आणि शहर अशी तडजोड करीत निर्णय झाल्याचे कळते. अधिकृतपणे त्याचीही घोषणा झालेली नाही. दुसरीकडे सोलापुरात प्रभाव असलेले नेते सुभाष देशमुख भाजपपासून दूर गेले आहेत. शिवसेना सक्रिय झाली नाही. रिपाइंचे नेते, कार्यकर्ते बोलावले की जातात असे एकंदर चित्र असल्याने बनसोडे यांना पक्षांतर्गत लढाईतच जास्त वेळ द्यावा लागेल, असे दिसते आहे.
अपक्षांची संख्या वाढली
काँग्रसेला अनुकूल वातावरण आहे असे चित्र निर्माण केले जात आहे पण मतविभागणी काँग्रेसला अडचणीची ठरू शकते, हे काही निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. यावेळी आम आदमी पार्टीची भर पडली आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या 10 वर पोहोचली आहे. शिवाय ‘नकारात्मक मत’ नोंदविण्याची सोय यावेळी झाली आहे. त्याचा फटका बसू शकतो. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला जवळपास एक लाखाचे मताधिक्य होते. एकूण 13 उमेदवार होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र येऊन लढत असल्याने ती काँग्रेसची जमेची बाजू आहे. शिंदे यांनी केलेल्या विकासकामांचा रथ घेऊन काँग्रेस मतदारांसमोर जात आहे.
आम आदमी, बसपच्या प्रचार यंत्रणेवर लक्ष..
यावेळी प्रथमच आम आदमी पार्टी सोलापूरच्या रिंगणात उतरली आहे. मूळचे सोलापूरचे नसले तरी सामाजिक कार्यकर्ते म्हणून ललित बाबर यांचा परिचय आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजप यांच्या तुलनेत त्यांच्याकडील यंत्रणा किती प्रभाव पाडते यावरच त्यांचे मतांचे गणित अवलंबून आहे. बहुजन समाज पक्षाने यावेळी संजीव सदाफुले यांना उमेदवारी दिली आहे. सोलापुरातील दलित, मुस्लिम, पद्मशाली, मराठा आणि इतर समाजाची मते खेचण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होत आहे. त्यादृष्टीने प्रचाराच्या यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. गुढीपाडव्यानंतर प्रचारात रंगत येईल. सध्या तरी प्रचारात फारसा जोर दिसत नाही.