आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Vijay Singh Against Pratap Singh Election Issue At Solapur

अग्निपरीक्षा : विजयसिंह की प्रतापसिंहांची!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या अनेक वर्षांपासून मोहिते कुटुंबीयांमध्ये एक छुपा कलह सुरू आहे. एका बाजूला प्रतापसिंह आणि दुसर्‍या बाजूला इतर बंधू अशा या संघर्षाचे नेमके कारण कुटुंबातील काही मंडळीच जाणतात. अनेक कार्यकर्त्यांनी ते जाणून घेण्याची इच्छाही दाखवलेली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतापसिंहांनी रणजितसिंह मोहिते यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. राजकीय निर्णय घेताना विजयसिंहांनी अनेकवेळा आपल्या मुलालाच प्राधान्य दिल्याचा प्रतापसिंहांचा आक्षेप होता. आता ते थेट विजयसिंहांच्या विरोधात लढणार आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध नेमका कुणाला आहे ? याबाबत मोहितेंचे कार्यकर्तेच नव्हे, नातेवाईकही संभ्रमात आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांनी आमच्या कुटुंबीयांमध्ये भांडण लावल्याचा आक्षेप प्रतापसिंहांकडून घेतला जात आहे, पण त्यातही तथ्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
नव्या पिढीत विसंवाद
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांच्यानंतर सर्व मुले एकत्र बसून राजकीय आणि कौटुंबिक निर्णय घ्यायचे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली. राज्य पातळीवर नाव कमावता आले. नव्या पिढीमध्ये संवादाचा अभाव आहे. परिणामी दोन बंधू एकमेकांविरोधात लढण्याच्या तयारीत आहेत.
तोडगा निघणार?
शंकरराव मोहिते यांनी राजकारणाच्या रूपाने दिलेली भाकरी सर्व भावांनी एकत्र मिळून खाणे अपेक्षित होते. कदाचित ते न झाल्यामुळेच प्रतापसिंह यांच्यासारखी आक्रमक, महत्त्वाकांक्षी व्यक्ती दुखावली असणार. त्यामुळेच त्यांच्याकडून स्वत:च्या मुलासाठी नवीन भाकरी तयार करण्याचा प्रयत्न होतोय. या परिस्थितीवर निर्णय घेण्याचा अधिकार ज्येष्ठ म्हणून विजयसिंहांनाच आहे. जयसिंह मोहिते यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना प्रतापसिंहांशी चर्चा करायची असेल तर विजयसिंहच करतील, असे सांगितले होते. त्यामुळे विजयसिंह त्यांच्याशी चर्चा करतील का? याचा उलगडा शनिवारी दुपारपर्यंत होईल. त्यामुळे आजचा दिवस विजयसिंह आणि प्रतापसिंह या दोघांच्या अग्निपरीक्षेचा आहे.
वर्ष : 2014
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर
प्रतापसिंह मोहिते यांची माढा लोकसभेसाठी उमेदवारी दाखल.. त्यानंतर ते म्हणाले, ‘शरद पवार यांनी माढय़ातून माझे बंधू विजयसिंह मोहिते यांना मुद्दामहून उमेदवारी दिली. त्यांनी आमच्यात भांडण लावले आहे. पवार हे केंद्रीय मंत्रिमंडळात दुसर्‍या क्रमांकाचे नेते आहेत. तरीही त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. आता ती विजयसिंह कशी पूर्ण करणार?’
वर्ष : 2009
स्थळ : शिवरत्न बंगला, अकलूज.
विजयसिंह मोहिते यांचा पंढरपुरातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय.. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची सभा.. या वेळी राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा समाचार घेताना प्रतापसिंह मोहिते म्हणाले, ‘मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत विजयदादांच्या केसालाही धक्का लागणार नाही.’
राकेश कदम, सोलापूर
गेल्या पाच वर्षांत विजयसिंहांची राजकीय परिस्थिती बदलली नाही. पण प्रतापसिंहांनी आपली भूमिका बदलली. शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आपल्या भावाची राजकीय कारकीर्द आणि आपल्या मुलाचे राजकीय भविष्य याची अचूक जाणीव असणारे प्रतापसिंह नेमके काय करणार याचा उलगडा दुपारी तीनपर्यंत होईल. पण त्यांच्या कोणत्याही निर्णयाची मोहिते कुटुंबीयांच्या आणि जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नोंद होईल.
नुकसान होणार कोणाचे?
प्रतापसिंहांच्या उमेदवारीने विजयसिंहांचे नुकसान होणार की नाही हे 16 मे 2014 रोजीच दिसून येईल. दरम्यान, एकमेकांवर केल्या जाणार्‍या चिखलफेकीमुळे अनेकांची करमणूक होईल. आजघडीला एकमेकांविरोधात लढणारे बंधू आणि नव्या पिढीतील मुले राजकीय, कौटुंबिक परिस्थिती पाहून एकही होतील, परंतु आजच्या निर्णयाचे कुटुंबावरही मोठे परिणाम होणार आहेत. शिवाय या मंडळींसाठी झटणारे कार्यकर्तेही एकमेकांची डोकी फोडून घेतील. त्यांचेही कधीही न भरून निघणारे नुकसान होईल.