आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांनी घेरले विद्यमान आमदारांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आमदार दिलीप माने, प्रणिती शिंदे आणि विजय देशमुख या तिन्ही आमदारांना त्या, त्या पक्षातील इच्छुकांनी चांगलेच घेरले आहे. त्यातून बंडखोरी तर होईलच पण मतविभागणीचा धोक्यामुळे विद्यमान आमदारांना खुपच सावध रहावे लागणार आहे. शिवसेनेतून इच्छुक असलेल्या महेश कोठे यांच्या विरोधातही शिवसेनेचा एक गट उभा ठाकला आहे. शहरातील राजकारणात या निवडणुकीत बरीच उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत.

सर्वांनाच आमदार व्हायचे आहे, त्यातून सत्तास्पर्धेचा संघर्ष विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे.
शहरातील तिन्ही आमदारांना पक्षांतर्गत विरोधकांनी पुरते हैराण करून सोडले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातून इच्छुकांची गर्दी वाढली आहे. तेथे काँग्रेसचेच बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे काँग्रेसकडूनच इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादीचे सुरेश हसापुरे यांनी आता आघाडीचा धर्म न जुमानता दोन हात करायचे ठरविले आहेच. भाजप-सेनेतही ही स्थिती आहे. अनेकांनी उमेदवारींसाठी देव पाण्यात ठेवले असलेतरी महायुतीलाही बंडखोरीची लागण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहर मध्य मतदार संघ अधिकच चर्चेत येऊ लागला आहे. प्रणिती शिंदे यांच्यामुळे तो राज्यातही चर्चेत आला आहे. काँग्रेसमध्येच राहून तौफीक शेख आणि माजी महापौर यु. एन. बेरिया यांनी विद्यमान आमदार असतानाही आपणही इच्छुक आहोत असे प्रदेश काँग्रेस कमिटीला ठासून सांगितले आहे. यात तौफीक शेख यांनी जोरदार तयारी दाखविली आहे. बेरिया हे पक्षनिष्ठ असल्याने ते बंडखोरी करण्याची शक्यता नाही, मात्र तौफीक शेख बंडखोरी करतील का?, त्यांना मुस्लिम समाज एकगठ्ठा स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न उत्सुकता वाढविणारे आहेत.