आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरवर जमू लागले राजकीय ढग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहर मध्य मतदारसंघ डोळ्यांसमोर ठेवून माजी आमदार नरसय्या आडम यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे, तर आपले वर्चस्व कायम राहावे यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला शहरातील आपली ताकद वाढविण्याला मदत होईल असा ‘युवती मेळावा’ खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत घेऊन मरगळ दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना आणखी जवळपास दीड ते दोन वर्षांचा कालावधी असताना आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाल्याचे चित्र सध्या शहरात दिसते आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांनी गेल्या आठवड्यात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीची बैठक घेतली. पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य, खासदार सीताराम येचुरी त्यासाठी तीन दिवस सोलापुरात होते. पूर्व भागात मेळावा घेऊन माकपच्या चळवळीला आणखी धार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यापाठोपाठ आमदार प्रणिती शिंदे यांनी स्त्रीभ्रूण हत्येविरोधात चळवळ उभारण्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि इतर पक्षांतील महिलांना एकत्र आणून एक वेगळा संकेत देत प्रयत्न सुरू केले आहेत. यामागे कोणतेही राजकारण नसलेतरी एकूणच वातावरणाचा फायदा त्यांना होऊ शकतो. प्रणिती शिंदे यांचे हे प्रयत्न होत असताना नरसय्या आडम यांनी लागलीच गोदुताई विडी कामगार घरकुल योजनेत हजारो महिलांना एकत्र आणून स्त्रीभ्रूण हत्येविरोधी शपथ घ्यायचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
महापालिका निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. एकाच विषयावरील माजी आमदारांचा ‘शपथ’ कार्यक्रम तर आमदारांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी हे कार्यक्रम राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरले आहेत. माकप आणि काँग्रेसच्या या लढाईत आपलीही ताकद दिसून यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला युवती मेळाव्याचे चांगले निमित्त मिळाले आहे. खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी सोलापुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमही होत आहेत. मात्र, पक्षात असलेली नेत्यांची गटबाजी आणखी डोके वर काढताना दिसू लागली आहे. शहरात ठिकठिकाणी डिजिटल फलक लागले आहेत. यातील काही फलकांवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे छायाचित्र दिसत नाही. हे पक्षांतर्गत शह, काटशहाचे डिजिटल वॉर चर्चेत आले आहे. खासदार सुळे यांचा दौरा पक्षात उत्साह निर्माण करेल, अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस ; खासदार सुप्रिया सुळे 10 जुलै रोजी सोलापूर दौर्‍यावर