आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pomegranate Development Center Anniversary Program In Solapur

'शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद वाढला तरच संशोधनाला अर्थ उरेल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शेतकरी हुशार, अनुभवी आहेत. शास्त्रज्ञांचाही चांगला अभ्यास आहे. पण झालेले संशोधन शेतात पोहोचण्यासाठी शेतकरी-शास्त्रज्ञांतील संवाद वाढला पाहिजे, तरच झालेल्या संशोधनाला काही अर्थ उरेल, असे मत कर्नाटकच्या कृषी आयोगाचे अध्यक्ष डॉ. एस. ए. पाटील यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे होते.विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जनार्दन कदम, डाळिंब संघाचे राज्याध्यक्ष रवींद्र नवलाखा, प्रगतिशील शेतकरी जयसिंह देशमुख, डाळिंब केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल व्यासपीठावर होते.

डॉ.पाटील म्हणाले, ‘पंजाब, हरियाणाचे शेतकरी प्रगतशील समजले जातात. पण केवळ गव्हासारख्या पिकांमध्ये त्यांची आघाडी आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकर्‍यांची तुलना केल्यास डाळिंब किंवा अन्य कोणतेही फळपीक त्यांची उत्पादकता विचारात घेतल्यास त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सर्वाधिक आहे. कोरडवाहू शेतकरी फार विचार करतो, त्याची बौद्धिकक्षमता चांगली आहे. त्यातूनच वेगवगेळ्या प्रयोगाकडे तो वळतो. या शेतीला संशोधनाच्या माध्यमातून वळण देण्याची गरज आहे.’ डॉ. कदम यांनी डाळिंब संशोधन केंद्राचे काम योग्यपद्धतीने सुरू आहे. विभागीय केंद्रात पुढील वर्षी डाळिंबाची रोपवाटिका सुरू करणार असल्याचे सांगितले.

शेतकरी देशमुख यांचेही भाषण झाले. प्रास्ताविकात केंद्र संचालक डॉ. पाल यांनी संशोधन केंद्राच्या कामाचा आढावा घेताना, कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश सांगितला. डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिनेश बाबू यांनी आभार मानले.

शेडनेटमधून प्रात्यक्षिक प्लॉट वाढायला हवेत
शेतकर्‍यांच्या शेतावर आधुनिक पद्धतीने शेडनेटमध्ये प्रात्यक्षिक प्लॉट तयार केले पाहिजेत. आपल्या कार्यक्षेत्रात किमान 200 प्लॉट तयार झाले, तर त्यातून डाळिंबाची गुणवत्ता, उत्पादकता आणि कीड-रोगांच्या उपायांसाठीचे निष्कर्ष मिळतील. शिवाय शेतकर्‍यांचाही फायदा होईल, याचा विचार व्हावा, अशी सूचना डॉ. पाटील यांनी केली.

औपचारिकता नको, उपचार हवा
डाळिंब संशोधन केंद्राचा वर्धापनदिन साजरा करायचा म्हणून साजरा करायला नको, तर यानिमित्ताने गेल्या वर्षभरात किंवा आतापर्यंत संशोधन केंद्रात काय काम झाले आणि पुढील वर्षभरात शेतकर्‍यांसाठी आपण काय देणार आहोत, याचा आढावा घेण्याची गरज आहे, असे मत डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी व्यक्त केले. अन्यथा, ही केवळ कार्यक्रमाची औपचारिकता ठरेल, तो उपचार ठरणार नाही, असेही ते म्हणाले.

12 व्या पंचवार्षिक योजनेत शेतकरी केंद्रबिंदू
12 व्या पंचवार्षिक योजनेच्या कमिटीवर आपण काम करत आहोत. माझ्या अभ्यासातून छोट्या, कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी काही सूचना केल्या आहेत. शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळायला हवे, बियाणांसह खतांची गावपातळीवर सरकारी यंत्रणेकडून तपासणी व्हावी, पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी, छोट्या योजना आणि सवलतीचे नियोजन यासारख्या विविध मुद्दय़ांसह 10 ते 12 विषय सुचवले आहेत. आता नियोजन आयोगाकडे त्या पाठवल्या आहेत. येत्या 2-3 महिन्यांत त्यावर निर्णय अपेक्षित आहे, असेही डॉ. पाटील म्हणाले.