आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॅक्स दिलाच पाहिजे, ऊर्जामंत्री शिंदे यांनी केले सूचक वक्तव्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: सुविधा पाहिजे असल्यास नागरिकांनी टॅक्स दिला पाहिजे. महापालिका आर्थिक डबघाईला आली असल्याने सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून जमाखर्च पहावा, टॅक्स वाढ आणि वसूल केल्यास सोलापूर महापालिका राज्यात पहिल्या क्रमांकावर येईल, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी केले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत शहर व हद्दवाढ भागात 212 कोटी 50 लाख रुपयांच्या भुयारी गटार करावयाच्या कामाचा शुभारंभ र्शी. शिंदे यांच्या हस्ते कल्याणनगर भागात करण्यात आला.
हद्दवाढ होऊन 22 वर्षांचा कालावधी लोटल्याचे सांगत शिंदे म्हणाले, शहराने त्याग करून हद्दवाढीला सुविधा देण्याची भूमिका घेतली पण दुर्दैवाने तसे झाले नाही. उजनीचे पाणी आणताना आपल्यावर सर्वांनी टीका केली. इतका खर्च कशाला, हिप्परगा येथून ग्रॅविटीने पाणी येईल, असे सांगण्यात आले. पण आज उजनीतून पाणी आणल्यानेच शहरवासीयांना पाणी मिळत आहे. महापालिकेला टॅक्स वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. लोक टॅक्स देतात, पण वीज व पाणी सुरळीत द्या अशी मागणी करतात.
सुशीलकुमार शिंदे भाषणात दिलीप माने यांचे कौतुक करताना म्हणाले, निवडणुकीत पडतो तोच ताठ उभारतो, बाकीच्या पडलेल्यांबद्दल बोलत नाही, त्यांनीही पुन्हा उभारावे. या वेळी महेश कोठेंकडे पाहून सर्वामध्ये हशा पिकला.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महापौर अलका राठोड, आमदार प्रणिती शिंदे, विजयकुमार देशमुख, दिलीप माने, उपमहापौर हारून सय्यद, सभागृह नेते महेश कोठे, माजी मंत्री आनंदराव देवकते, बाळासाहेब शेळके, रोहिणी तडवळकर, विनायक कोंड्याल, मल्लेश बडगू, दिलीप कोल्हे, आनंद चंदनशिवे, महापालिका आयुक्त अजय सावरीकर व्यासपीठावर उपस्थित होते.
ढोबळेंना रागावण्याचा मला हक्क
ढोबळे विचारवंत नेतृत्व असून मधुरवाणीचे आहेत. त्यांना मी कधी-कधी रागावतो, कारण माझा तो हक्क आहे. मी सत्तेत असेपर्यंत ठीक नाही तर कोण ऐकतो, माझी स्थितीही देवकतेंसारखी होणार आहे. पहिल्यापासून आपला स्वभाव सौम्य आहे. पण दिलीप माने तुम्ही रागावून बोलू शकता. आम्ही शिस्त लावू शकलो नाही, तुम्ही लावा.
तशा उणिवा पुन्हा नकोत
नेहमीच्या शैलीत आपल्या भाषणातून काँग्रेसवाल्यांना चिमटे घेताना ढोबळे म्हणाले, भुयारी ड्रेनेज कामाच्या दर्जाकडे अधिकार्‍यांनी लक्ष दिले पाहिजे. उजनीतून पाणी आणण्याचे काम शिंदे यांनी मोठय़ा कष्टाने केले. पण शेवटच्या 10 किलोमीटरमध्ये पाइप खराब टाकल्याने जलवाहिनी सातत्याने फुटते आहे. तशा उणिवा या कामात राहू नयेत. पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव सर्व पक्षाच्या सहकार्याने मंजूर झाला. पण मीटररायजेशन झाले नाही. या वेळी बसपाचे नगरसेवक यांनी आक्षेप घेत पाणीपट्टीवाढीला आमचा आजही विरोधच असल्याचे सांगितले.
आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, या निधीतून हद्दवाढ भागातील 65 टक्के ड्रेनेज वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होणार आहे. उर्वरित 35 टक्के काम हे माझ्या मतदारसंघातील आहे. ऊर्जामंत्री शिंदे, पालकमंत्री ढोबळे यांना विनंती करतो की, पुढील टप्प्यात का होईना उर्वरित 35 टक्क्याचे काम हाती घ्यावे.
आमदार दिलीप माने यांनीही मनोगत व्यक्त केले. पंचतारांकित हॉटेल आणि एनटीपीसी पकल्प होत आहेत, यासाठी शिंदे यांनी विमानसेवा सुरू करावी अथवा बोरामणी विमानतळाचे काम तरी लवकर तडीस न्यावे. शिंदेंनी मात्र विमानतळाचा चेंडू राज्य सरकारकडे टोलवला.
काही ठळक नोंदी
> दिलीप माने यांनी भाषणातून महापौरांचा नामोल्लेख करताना माजी शिक्षिका तर उपमहापौरांना माजी नळवाले असे संबोधले.
> उपमहापौर दीपप्रज्वलनासाठी आल्यानंतर मेणबत्ती व सर्व दिवेही विझले.
> सीना-कोळेगाव पाणीप्रश्नावर होत असलेल्या राजकारणाबाबत दिलीप माने म्हणाले, भविष्यात उजनीतून मराठवाड्याला पाणी जाणार हे कोणी विसरू नये.
> पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाषणातून एनटीपीसीला शेतकर्‍याच्या हिताचे पाणी दिले जात असल्याचा उल्लेख केला. तेंव्हा ऊर्जामंत्री शिंदेंनी ढोबळेंचे भाषण रोखून पाणी शेतकर्‍यांच्या हिताचे नव्हे तर इंडस्ट्रीजचे घेतल्याचे स्पष्ट केले.
नगरोत्थान योजनेतून हद्दवाढ भागात भुयारी गटारीचा शुभारंभ करताना केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे. त्यावेळी उपस्थित राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे, महापौर अलका राठोड, आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार दिलीप माने, सभागृह नेते महेश कोठे आदी.