आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prakash Patil Honorud With President Police Award

..हा आनंद पाहण्यासाठी आई, बाबा हवे होते !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आम्ही मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिकटाकळीचे. गावातील प्रत्येक घरात दोन-तीन तरुण सैन्यात. माझा भाऊही सैन्यात कॅप्टन होता. आपसूकच मलाही वर्दीचे आकर्षण होते. आई-बाबाही सैन्यात नको पण पोलिसात जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. कारण एक मुलगा तरी डोळ्यासमोर असावा, अशी त्यांची मनीषा. 1984 मध्ये फौजदार परीक्षा पास झाल्यानंतर आई-बाबांना खूप आनंद झाला. आज राष्ट्रपती पदक जाहीर झाले. या आनंदात सहभागी होण्यासाठी आई-बाबा नाहीत. ते असते तर.. असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. स्वत:ला सावरत हा पुरस्कार म्हणजे आई-बाबांची प्रेरणा आहे, असे मत वाहतूक शाखेचे (उत्तर विभाग) पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांना शुक्रवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. त्यानंतर त्यांचा मोबाइल, कार्यालयातील दूरध्वनी खणखणू लागला.मोबाइल मेसेज बॉक्सही भरत होता. अभिनंदन, शुभेच्छा स्वीकारत त्यांच्या कार्यालयात बातचीत करताना ते सांगत होते. 1984 मध्ये फौजदार झाल्यानंतर नाशिक, सांगली, सीआयडी (गुप्तवार्ता) येथे काम केले. त्यानंतर रत्नागिरी, पुणे येथे काम करताना पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली. मे 2011 ला सोलापुरात बदली झाली. वडील निवृत्ती हे शेतकरी होते. आई कृष्णाबाई गृहिणी होत्या. पत्नी संगीता गृहिणी असून मुलगा ऋषिकेत हा आयआयटी (गांधीनगर, गुजरात) येथे अभियंता आहे. मुलगी प्रांजली ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असून बंगळुरात आयटीत कामाला आहे.

..आणि मुलगी सुटी घेतली - राष्ट्रपती पदक मिळाल्याचे मी पत्नीला सांगितलो. तिने मुलीला सांगितले. ती आनंदीत होऊन मला फोन केला. पप्पा बेस्ट लक..मी हाफडे सुटी घेऊन घरी जाते, मी आनंदी आहे असे अभिनंदन केले. मुलानेही फोन केला तो एका महत्त्वाच्या वर्कशॉपमध्ये असल्यामुळे अभिनंदनचा फोन केला. पत्नीने कौतुक केले. कार्यालयातील पोलिस कर्मचार्‍यांनीही पेढे वाटून आनंद साजरा केला. पोलिस आयुक्त, उपायुक्त, साहायक आयुक्त, निरीक्षक व अन्य अधिकारी, कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

तो तपास प्रेरणादायी ठरला.. - बारा वर्षांपूर्वी मी सांगलीत क्राइम पीआय होतो. एका तरुणाला गाडीने ठोकरले. तो जखमी झाला. पण त्याला त्याच चालकाने गाडीत घालून नेऊन डोक्यावर हल्ला केला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह सातारा जिल्ह्यातील एका नदीत फेकून दिला. मृत तरुणाच्या पत्नीने येऊन मला माहिती दिली. मृत तरुणाच्या घरात चोरी झाल्याचा बहाणा करून आरोपींनी तपासाची दिशा बदलली होती. पण त्याचा खून करून नदीत फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींना जेरबंद केल्याचे समाधान मला मिळाले. आरोपींचा गावात दरारा होता. एका महिलेला न्याय मिळवून दिला. हा तपास आयुष्यात प्रेरणादायी असल्याचे पाटील म्हणाले. जत तालुक्यातील तीन ट्रॉली गांजा जप्त केल्याचा थरार त्यांनी सांगितला.