आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्षाळपूजेने विठ्ठल-रुक्मिणीचा शीण गेला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - दरवर्षी आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळपूजेचा उत्सव होतो. यात्रांच्या काळात येथे भक्तांची मांदियाळी असते. लाखोंच्या संख्येने येथे वारकरी येतात. प्रत्येक वारकर्‍याला दर्शन होण्यासाठी श्रीविठुराय हे दिवसरात्र उभे असतात. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोज पहाटेचा काकडा, दुपारी साडेपाच वाजता दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूपआरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंग काढण्यात येतो. अहोरात्र दर्शन देऊन श्रीविठ्ठलाला थकवा आलेला असतो. हा थकवा, शिणवटा काढण्यासाठीच आषाढी व कार्तिकी यात्रा झाल्यानंतर शुभदिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव करण्यात येत असतो. अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. त्यानुसार आज ही विधी पार पडला. शनिवारी (ता.7) श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. आज रविवारी दुपारी 12 वाजता श्रीविठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घातले. मंदिर समितीच्या वतीने मंदिरातच गरम पाण्याची खास व्यवस्था केली होती. या गरम पाण्यानेच बडवे, उत्पात तसेच श्रीविठ्ठलाच्या सर्व सेवाधारी मंडळींनी यथेच्छ स्नान केले. त्यानंतर या मंडळींच्या घरातून तसेच शहरातील बहुतांश लोकांच्याही घरातून आजच्या दिवशी पुरळपोळीचा नैवेद्य करण्यात येतो. पुरणपोळीचा नैवेद्य र्शीविठ्ठलाला दाखविण्यात आला. सायंकाळी साडेपाच सहाच्या सुमारास देवाला आकर्षक पोशाख परिधान करून पारंपरिक अलकारांनी सजविले. सायंकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे धूप आरतीचा कार्यक्रम झाला. आजच्या प्रक्षाळपूजेपासून मंदिरातील श्रीविठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू झाले.
नित्योपचारास प्रारंभ
- पहाटे काकडा आरती, दुपारी महानैवेद्य, साडेपाचच्या दरम्यान र्शी विठुरायांना पोशाख व अलंकार घालणे, सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान धुपारती, रात्री शेजारती करण्यात येते. रात्री एक नंतर मंदिर बंद असते.

श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रविवारी प्रक्षाळपूजेचा उत्सव मोठय़ा उत्साहात झाला. केशर पाण्याच्या स्नानानंतर येथील बडवे, उत्पात, सेवाधारी तसेच शहरातील नागरिकांकडूनही परंपरेनुसार रात्री गवती चहासह विविध प्रकारचे 15 ते 16 पदार्थ घालून खास बनलेला काढा श्रीविठ्ठलास दाखवण्यात आला. श्रीविठ्ठल व रुक्मिणीस यात्रा काळात 24 तास भक्तांना दर्शन देऊन थकल्याचा शिणवटा जावा म्हणून ही प्रथा आहे.
काढाही घेतला विठ्ठलाने
श्रीविठ्ठलाचा थकवा दूर व्हावा, यासाठी त्याला खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू , बदाम बी, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग वेलदोडा, दालचिनी, चारोळे आदी पदार्थांपासून खास काढा बनवण्यात येतो.