आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'घराचे आमिष दाखवून मारला डल्ला' -प्रणिती शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गरीब-कष्टकऱ्यांनाघर देण्याचे आमिष दाखवत त्यांच्या पैशांवर डल्ला मारून स्वत:चे खिशे भरले. या निवडणुकीत मला साथ द्या, तुमच्या हक्काचे पैसे व्याजासह परत मिळवून देते, अशी टीका शहर मध्यच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी माजी आमदार नरसय्या आडम यांचे नाव घेता केली.

शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांची कॉर्नर सभा बुधवारी दत्तनगरात झाली. माजी केंद्रीय मंत्री सर्वेसत्यनारायण सभेच्या अध्यक्षस्थानी होते. माकपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दत्तनगरात आमदार शिंदेंनी आक्रमक पद्धतीने भाषण करीत माजी आमदार आडम यांच्या कार्यपद्धतीवर खरपूस टीका करीत वाभाडे काढले.
आमदार शिंदे म्हणाल्या, “सन 2004 मध्ये माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसची जागा कम्युनिस्ट पार्टीला सोडली. काँग्रेसचा पाठिंब्यामुळे आडम यांचा विजय झाला. अन्यथा, तेव्हाच त्यांचा पत्ता कट झाला असता. काँग्रेसने गरिबांसाठी घरांची योजना आणली होती. त्याद्वारे गरिबांची फसवणूक करीत विरोधकांनी त्यांच्याकडून पैसे लाटलेत. स्वत:च्या निवडणुकीसाठी पावत्या फाडत गरिबांकडून पैसे उकळत आहेत. एकच घर मुस्लिम पद्मशाली समाजाला दाखवून त्यांची दिशाभूल सुरू आहे. गरिबांच्या नावावर पैसे उकळणाऱ्यांना लाज वाटत नाही का? अशा शब्दात आमदार शिंदे यांनी टीका केली.

काँग्रेस पक्षाच्या जीवावर मोठे झालेले लोक गरिबांना छळण्यासाठी शिवसेनेत गेलेत. शिंदेसाहेबांनी मोठ्या विश्वासाने शहराच्या विकासासाठी महापालिकेच्या सत्तेची सूत्रं त्यांच्या हाती दिली. पण, विकासकामे करण्याऐवजी टक्केवारी घेऊन निकृष्ट कामे केली. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सर्वेसत्यनारायण, प्रेमलाल लोधा यांचीही भाषणे झाली. प्रणिती शिंदे यांनी भाषणाच्या अखेरीय जय मार्कंडेय अशी घोषणा दिली. विरोधकांनी गरिबांना घरांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून हजारो रुपये लुटून स्वत:चे खिसे भरले, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी हाताने खिशात गरिबांचे पैसे कसे कोंबले, हे दत्तनगरातील काॅर्नर सभेत साभिनय दाखवले.