आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratapsinh Mohite News In Marathi, Lok Sabha Election, Solapur, Divya Marathi

बंडखोर व्यक्तिमत्त्व अन् वादग्रस्त परंपरा,प्रतापसिंहांपुढे अस्तित्वाचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात आजवर अनेक नाट्यमय घडामोडींची परंपरा राहिली आहे. पक्षांतर्गत शह, काटशह हा विषय नवीन नाही. मात्र प्रतापसिंह मोहिते यांनी गेल्या 20 वर्षांत अनेक धाडशी राजकीय निर्णय घेऊन एकूणच राजकारणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी लोकसभेला त्यांनी आपल्या थोरल्या बंधूंविरुद्धच भूमिका घेऊन जिल्ह्याचे राजकारण तापवले आहे.


यापूर्वीही आले होते आमने-सामने
माळशिरस जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून मदनसिंह मोहिते उमेदवार होते, त्यांच्या विरोधात प्रतापसिंहांच्या पत्नी पद्मजादेवी मोहिते यांनी निवडणूक लढविली. ती जिल्ह्यात चर्चेचा विषय होती. मदनसिंह निवडून आले होते.

भाजपात प्रवेश अन् राज्यमंत्रिपदही
युती सरकारच्या काळात त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपबरोबर सूर जुळवित प्रवेश मिळविला आणि विधानपरिषदेवर आमदारकी अन् राज्यमंत्रिपदही मिळविले. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला ताकद मिळाल्याचे वातावरण होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे रण जिंकूनही त्यांनी दाखवले होते.

2003 मध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला उमेदवारी दिली. एकीकडे विजयसिंह मोहिते राष्ट्रवादीत राजकीयदृष्ट्या अस्वस्थ होते, त्याचवेळी प्रतापसिंहांना उमेदवारी मिळाल्याने मोहिते कुटुंबांत उत्साह होता. विजयसिंह आणि रणजितसिंह हे वगळता सर्व मोहिते कुटुंबीय, त्यांचे बंधू सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रतापसिंहांच्या बाजूने प्रत्यक्ष सक्रिय होते. त्यांच्या एकूणच प्रचार यंत्रणेमुळे प्रतापसिंह जिंकलेही. हा निकाल राज्यभर चर्चेत राहिला.


आता मोठय़ा बंधूशी घेतला पंगा
त्यानंतर मात्र ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्यात त्यांना पुन्हा काँग्रेसबरोबर सूर जुळवून घ्यावे लागले. काँग्रेसनेही त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 2009 च्या निवडणुकीत त्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठीही प्रयत्न केले. शरद पवारांना त्यांच्या घरी जावून पाहुणचार घ्यावा लागला होता. उदयनराजे भोसले यांचीही त्यांना साथ मिळाली होती. आता या लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी थोरले बंधू विजयसिंह मोहिते यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते किती यशस्वी होतील हे सांगता येणार नाही. पण त्यांच्या धाडशी राजकारणाचे पडसाद राजकीय वतरुळात उमटू लागले आहेत.