आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratapsinh Mohite News In Marathi, Sharad Pawar, Madha Lok Sabha Seat

प्रतापसिंहांसोबत 500 वाहनांचा ताफा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या प्रतापसिंह मोहिते यांच्या सर्मथनासाठी बुधवारी माळशिरस, पंढरपूर, माढा भागातील असंख्य कार्यकर्ते आले होते. सोलापूरकरांना वाहनांच्या ताफ्याचे जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. यावेळी पत्नी पद्मजादेवी, पुत्र धवलसिंह, सून उर्वशीराजे यांच्याबरोबर आठ महिन्यांची नात इलाक्षी हिची उपस्थितीही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अकलूजच्या श्रीराम मंदिरातील पुजार्‍यांनी काढलेल्या दुपारी 1.45 च्या मुहूर्तावरच प्रतापसिंहांनी उमदेवारी अर्ज दाखल केला.

प्रतापसिंह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा ताफा दुपारी 1.30 वाजेच्या सुमाराला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाला. प्रतापसिंहांनी दुपारी पंढरपुरातच विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी सोलापुरातून कोणत्याही प्रकारची रॅली, पदयात्रा न काढता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येणे पसंत केले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय होते. प्रतापसिंहांच्या भगिनी जयर्शी चव्हाण, धवलसिंहांच्या सासूबाई मेनकाराजे फाळके यांचीही उपस्थिती होती.


घरातला वाद नाही
अर्ज भरल्यानंतर प्रतापसिंह यांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला. विजयसिंह आणि माझ्यातील लढाईकडे घरातला वाद म्हणून पाहू नका. ही विचारांची लढाई आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला आहे. धवलसिंह मोहिते एका प्रश्नावर म्हणाले, हा दोन भावांचा विषय नाही. ही जिल्ह्याच्या स्वाभिमान, सन्मानाची लढाई आहे.


कार्यकर्ते उन्हातच थांबले
प्रतापसिंह सोलापुरात शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र ते आणि त्यांचे कुटुंबीय गाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयात आले. मागोमाग आलेले कार्यकर्ते भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ त्यांची वाट पाहात थांबले होते. 500 वाहनांचा ताफा घेऊन प्रतापसिंह सोलापुरात दाखल झाले होते. वाहने होम मैदानावर थांबली होती.