आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratapsinha Mohite News In Marathi, Modha Lok Sabha Seat, Solapur

विरोधक सोबत, पण घरातल्यांशी सूर जुळेना!, प्रतापसिंहांचा राष्ट्रवादीविरोधात प्रचार आरंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माढा लोकसभा मतदार संघात विजयसिंह मोहितेंना मदत करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रवादीचे विरोधक स्वत: पुढे येत आहेत. याउलट ‘आता माघार नाही’ असे म्हणत विजयसिंहांचे बंधू प्रतापसिंह मोहिते विविध भागांत जाऊन राष्ट्रवादी विरोधात प्रचार करत आहेत.


केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकत्याच केलेल्या पंढरपूर दौर्‍यानंतर माढा लोकसभा मतदार संघातील प्रचाराला वेग आला आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून टेंभुर्णीमध्ये लवकरच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सभा होणार आहे. करमाळा, माढा, सांगोला, पंढरपूर भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक विरोधकांनी मोहितेंचा प्रचार सुरू केला आहे.


संजय शिंदेंसाठी काय करणार?
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे अद्याप शांत आहेत. शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी उस्मानाबादेत शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी आपण राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणार नाही, मात्र प्रचारासाठी फिरणार नाही, असे सांगितले होते. आता शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी मोहिते काय करतात याकडे लक्ष राहील. संजय शिंदे यांच्या टेंभुर्णीजवळील फार्म हाऊसवर प्रतापसिंह मोहिते, धवलसिंह मोहिते आणि शिंदे यांच्यात गुफ्तगू झाले. प्रतापसिंहांनी शिंदेकडे पाठिंब्याची मागणी केली. मात्र शिंदेनी, ‘आपण शरद पवार यांना पक्षासाठी काम करणार असल्याचा शब्द दिला आहे. पुन्हा पाहू’ असे सांगितल्याचे समजते.


यांचे बंड शमवायचे कोणी ?
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रतापसिंहांच्या बंडावर विचार करण्यासाठी मोहिते कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची काही दिवसांपूर्वी बैठक झाली. तीत प्रतापसिंहांनी काही आश्वासन मागितल्यास कोण पूर्ण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला. शरद पवार आणि अजित पवारांवर टीका करून प्रतापसिंहांनी सर्वांची नाराजी ओढवून घेतली आहे. प्रतापसिंहांनी आरोप करायचे आणि त्यांचे परिणाम विजयसिंहांनी भोगायचे हा प्रकार नेहमीच होत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने जाऊ द्यावे, असे मत सर्वच ज्येष्ठांनी व्यक्त केले. त्यामुळे मोहिते कुटुंबींयाकडून प्रतापसिंहांच्या बंडाबाबत काहीच होणार नसल्याचे सांगितले.