सोलापूर- सोलापूर रेल्वे स्थानक आणि बसस्थानक येथून शहरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. बहुतेक वेळा रिक्षा चालक हे प्रवाशांकडून अव्वाच्यासव्वा भाडे आकारतात. अशा प्रकारास आळा बसावा म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी सोलापूर रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर प्रीपेड शेअर रिक्षांचे बूथ उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या महिनाभरात ही संकल्पना पूर्णत्वास असे सांगण्यात आले. त्यासाठी पुण्यातील सॉप्टवेअर कंपनी एनजीओशी चर्चा सुरू आहे.
सोलापूर शहरातील रिक्षा प्रामुख्याने पेट्रोल काही प्रमाणात एलपीजी या इंधनावर धावतात. या रिक्षांचे प्रवासी दर किती असावे याचा अभ्यास आरटीओकडून करण्यात येत आहे. आरटीओतर्फे रिक्षांसाठीचे दर पुन्हा एकदा निश्चित करण्यात येणार आहे. एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणचे अंतर किती, याची मोजणी करण्यात येत आहे. नवे दर ठरल्यानंतर त्या दराप्रमाणे रिक्षा चालकांने प्रवाशांकडून दर आकारणे गरजेचे असणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही आरटीओने दिले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी दरफलक
सोलापूर रेल्वे स्थानक, बस स्थानक, नवी पेठ, सातरस्ता, अासरा चौक, कुमठा नाका, अशोक चौक आदी ठिकाणी अारटीओ रिक्षाचे दरफलक लावणार आहे. त्या ठिकाणी संबंधित ठिकाणाचे अंतर त्यासाठीचे दर या दोन्ही बाबी दरपत्रकात समाविष्ट असणार आहेत. येत्या काही दिवसांत हे दरफलक उभारले जातील.
सॉफ्टवेअरची मदत
सोलापूर रेल्वे स्थानकावर बस स्थानकावर प्रिपेड रिक्षा शेअर रिक्षांचे बूथ उभारण्यात येतील. ज्या प्रवाशांना एकट्यासाठी रिक्षा हवी आहे त्यांनी प्रिपेड रिक्षांचा वापर करावा. ज्यांना शेअर करून रिक्षा हवी आहे त्यांनी शेअर रिक्षाचा वापर करावा. या दोन्ही रिक्षांसाठी स्वतंत्रपणे बुथ तयार केले जातील. तसेच सॉप्टवेअरदेखील तयार केले जातील.
- रिक्षाचालकांकडून प्रवाशांना आर्थिक भुर्दंड नको यासाठी प्रीपेड शेअर रिक्षांचे बुथ उभारण्यात येणार आहे. यासाठी रिक्षांचे भाडे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. येत्या एक महिन्यात बूथ सुरू करण्यात येईल.
बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर