आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात पालेभाज्या कडाडल्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. गेल्या महिन्यात पाच ते सहा रुपयांना मिळणारी मेथी व पालकाची पेंडी आता 10 ते 12 रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर इतर भाज्यांचे दरही पूर्वीच्या तुलनेत वाढले आहेत.

अनेक गावात पाण्याची टंचाई असल्याने शेतकर्‍यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याकडे पाठ फिरवली आहे. उन्हाची तीव्रता व कमी उत्पादनामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. बाजारात सद्यस्थितीत फळभाज्यांची आवक पालेभाज्यांच्या तुलनेत अधिक आहे.

वाढत्या उन्हामुळे भाज्या लवकर खराब होत असल्याने विक्रेत्यांना भाज्या ताज्या ठेवण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर पाण्याचा शिडकावा करावा लागत आहे. हिवाळ्याच्या तुलनेत भाज्यांचे दर जवळपास दुप्पट झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असल्याने अनेकांनी आता पालेभाज्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. बाजारात काकडी, कैरी, ढोबळी मिरची, गवारीची आवक वाढली आहे. पालेभाज्या महागल्याने बटाटे, कोबी, वांगे या फळभाज्यांचा रोजच्या आहारात वापर वाढला आहे. आगामी काळात जसजशी उन्हाची तीव्रता वाढेल तसतसे भाजीपाल्याचे भाव वाढतील, असा अंदाज आहे. भाजी बाजारात आता जून, जुलै महिन्यापर्यंत तेजी असेल, अशी माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.

बाजार समितीत आवक मंदावली

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या महिन्यापर्यंत पालेभाज्यांची दिवसाला साधारणपणे 20 ते 25 क्विंटल आवक होत होती. ही आवक आता पाच क्विंटलवर आली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. भाज्यांची आवक गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झाली असल्याची स्थिती आहे.’’ विकार शेख, बाजारभाव लिपिक, मार्केट यार्ड