आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवार देवतांच्या पुजारी नियुक्तीला आव्हान देणारा अर्ज कोर्टाने फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून मंदिरातील परिवार देवतांसाठी सुरू असलेल्या पुजारी नियुक्तीस स्थगिती देण्याच्या मागणीचा अर्ज दिवाणी न्यायाधीश गौडगोंडा यांनी बुधवारी (दि. २९) फेटाळल्याची माहिती समितीचे वकील डी. जी. भोसले यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नित्यपूजा करण्याचे अधिकार बडवे, उत्पात, सेवाधाऱ्यांना आहेत. ते त्यांना करू द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सध्या त्यावर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, मंदिर समितीकडून परिवार देवतांसाठी नवीन पुजाऱ्यांची नियुक्ती केली जात असल्याने त्याला स्थगिती देण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता.
अॅड. भोसले म्हणाले, १५ जानेवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बडवे,उत्पात सेवाधाऱ्यांची मंदिर अधिनियम कायदा १९७३ च्या कायद्याला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती. त्यामुळे या मंडळींचे मंदिरातील हक्क अधिकार संपुष्टात आले. तसेच १९७३ चा विठ्ठल मंदिर कायदा नाडकर्णी आयोगाने बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांनी व्यवस्थापन करणे, दक्षिणा मागणे, भाविकांच्या वतीने पूजा करणे हे हक्क रद्द केले आहेत. त्यासंदर्भात बंडोपंत बडवे यांनी येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांच्याच वंशजांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा करावी, अशी कायद्यात नाडकर्णी समितीच्या शिफारशीत तरतूद असल्याचा युक्तिवाद सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. धनंजय रानडे यांनी केला होता. तर मंदिर समितीचे अॅड. भोसले यांनी हा खटला चालवण्याचे अधिकार या न्यायालयाला आहे का, असा युक्तिवाद केला.

दरम्यान, मंदिर समितीकडून परिवार देवतांच्या पूजाअर्चेसाठी होत असलेल्या नवीन पुजारी आणि सेवक भरतीस स्थगिती मिळावी असाही याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रानडे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयात मंगळवारी (दि. २८) बुधवारी सुनावणी झाली.

भरती अंतिम टप्प्यात
पुजारीभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला. मूळ याचिकेची सुनावणी येत्या जून महिन्यात होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अॅड. भोसले यांनी दिली.