आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन : जाचक अटी दुर् कराव्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, शिक्षण हक्क अधिनियम कायदा 2009 मधील जाचक अटी दूर कराव्यात, या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील 500 शिक्षकांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष राजन सावंत आणि जिल्हा सरचिटणीस राजा राऊत यांनी दिली.

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये विविध प्रश्न निर्माण झाले असून, या प्रश्नाबाबत शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर इच्छाशक्तीच्या अभावामुळे व प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समितीने धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

या धरणे आंदोलनप्रसंगी राज्य प्रवक्ते अनिल कादे, शिक्षक नेते अंकुश काळे, बाबा माने, श्रीकृष्ण कुंभार, भारत कुलकर्णी, संतोष हुमनाबादकर, रवी साठे, शिवानंद अरळीगीड, जितेंद्र कांबळे, मनोज ठोंबरे आदींसह अनेक शिक्षक उपस्थित होते.

या आहेत मागण्या
या वेळी पटसंख्येच्या निकष लावून कुठलीही शाळा बंद करू नये, शालार्थ वेतनप्रणालीमध्ये सुधारणा करावी, सर्व शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा निर्माण करावी, विनाअट विनंती व आपसी बदल्यांना परवानगी द्यावी, शंभर टक्के विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावा, कॅशलेस वैद्यकीय सुविधा कर्मचा-यांना लागू करावी, महादेव कोळी समाजातील कर्मचा-यांना सेवा संरक्षण द्यावे, सर्व शाळांमध्ये वीज व पाणी मोफत मिळावे, पाचवीचा वर्ग जोडण्यात आलेल्या शाळांना स्वतंत्र शिक्षक मिळावेत, एमएससीआयटी अर्हता धारणेसाठी मुदतवाढ मिळावी, प्राथमिक शिक्षकांकडील मतदार नोंदणी व अन्य अशैक्षणिक कामे कमी करावीत.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.