आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमीपत्र का द्यावे? सुटा संघटनेचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सूचनापत्र पाठवून संपात सहभागी झालेल्या प्राध्यापकांकडून हमीपत्र लिहून घेण्याची सूचना दिली आहे. मात्र, एकही प्राध्यापक असे हमीपत्र भरून देणार नाही, अशी भूमिका सोलापूर विद्यापीठ टीचर्स असोसिएशनने जाहीर केली आहे. संपकरी प्राध्यापकांकडून भविष्यात असा संप करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य शासनाला केलेली आहे.

सोलापूर विद्यापीठातील 478 प्राध्यापक संपात सहभागी झाले होते. उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरविल्यानंतर या प्राध्यापकांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकून 93 दिवस चालवलेला संप तत्काळ मागे घेतला होता. यासंदर्भात बोलताना एम. फुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. भारत जाधव म्हणाले, की उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार क्लॉज 22 पाहिला तर जे प्राध्यापक संपात सहभागी झाले व ज्यांना विद्यापीठाने परीक्षा कामकाजात सहभागी न झाल्याने शो कॉज नोटीस दिली अशाच प्राध्यापकांकडून हमीपत्र भरून घ्यावयाचे आहे. प्रत्यक्षात सरकारी खाक्यानुसार विद्यापीठाने प्राचार्यांना पत्रे पाठवून सर्वच प्राध्यापकांकडून भविष्यात परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकणार नाही, अशा आशयाचे हमीपत्र लिहून घ्या, त्याची प्रत विद्यापीठाला पाठवा, अशा सूचना दिली आहे.

आम्ही प्राध्यापकांना आवाहन केले आहे, की असे हमीपत्र लिहून देणे हेच मुळात अन्यायकारक ठरेल. 2006 मध्ये दिलेले लेखी आश्वासन पाळणे सरकारला शक्य झालेले नाही. या अन्यायावर दाद मागितली. तर उलट हमीपत्र मागितले जात आहे, हेच चुकीचे आहे.


संपकाळातील एकाही प्राध्यापकाला सोलापूर विद्यापीठाने नोटीस दिलेली नाही. सर्वच प्राध्यापकांकडून भविष्यात परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकणार नाही, असे हमीपत्र लिहून त्याची एक प्रत विद्यापीठ तर एक प्रत शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात यावी, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.’’ डॉ. दादासाहेब साळुंखे, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्राध्यापकांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत सहसंचालक कार्यालयाने त्याबाबतची सूचना सोलापूर विद्यापीठाला दिलेली आहे.’’ डॉ. अरुणा विंचूरकर, उच्च शिक्षण विभाग सहसंचालिका