आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Protest In Front Of Co operation Minister Patil's House

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारमंत्री पाटील यांच्या घरावर मोर्चा, आंदोलनाची रघुनाथ पाटील यांनी दिली माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शेतमाल भाव समितीने केलेली शिफारस आणि केंद्र शासनाने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत या मधील तफावतीची रक्कम राज्य शासनाने शेतकऱ्यांना द्यावी या मागणीसाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर येथील घरावर १० जून रोजी विराट मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर हेंबाडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
रघुनाथ पाटील म्हणाले, जीवनावश्यक वस्तू कायद्यात समाविष्ट केलेल्या सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याचे शासनास घटनात्मक बंधन आहे. त्यानुसार कापूस, ऊस या पिकांसह खरीप रब्बी हंगामातील कडधान्य, भरडधान्य, तेलबिया आदी प्रकारांमधील शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) केंद्र सरकारकडून दरवर्षी जाहीर केल्या जातात. महाराष्ट्र राज्य शेतमाल भाव समितीने शिफारस केलेल्या शेतमालाच्या किमती आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किंमती या मधील तफावतीची रक्कम राज्य सरकारने शेतकऱ्यांना देणे अपरिहार्य आहे.
सार्वजनिक बँका, सार्वजनिक उद्योग आणि महामंडळे यांना होणारा तोटा केंद्र राज्य शासन ज्या प्रमाणे भरून देते. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य शेतीमाल भाव समितीने केलेली शिफारस आणि केंद्र सरकारने जाहीर केलेली आधारभूत किंमत यामधील असलेली तफावत रक्कम राज्य सरकारने शेतकऱ्यांना द्यावी या मागणीसाठी मोर्चा काढणार आहोत.
श्री. पाटील म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अनेक भागामध्ये पिण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. वीस, वीस महिने पोसून कारखान्यांना घातलेल्या उसाला अद्यापही एफआरपी प्रमाणे भाव देण्यात आलेला नाही. पाण्याच्या बाटलीला किंमत आहे मात्र गायी, म्हशीच्या दुधाला योग्य दाम नाही, केंद्र राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. आत्महत्या करण्यापेक्षा काही तरी वेगळे करून मरण पत्करण्याच्या मानसिकतेत सध्या शेतकरी आल्याने राज्यकर्त्यानी गंभीर दखल घ्यावी अशी त्यांनी मागणी केली.
इथेनॉल संदर्भात निर्णय घ्यावा
केंद्रात वाजपेयी सरकार सत्तेत असल्यापासून इथेनॉल संदर्भात नुसत्या घोषणा होत आहेत. पेट्रोल, डिझेल पंपाप्रमाणे इथेनॉल पंप हवे आहेत. शेतकऱ्यांच्या सडलेल्या शेतमालापासून इथेनॉल होऊ शकते. त्यामुळे मोदी सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन इथेनॉलसंदर्भात निर्णय घेण्याची मागणी रघुनाथ पाटील यांनी केली आहे.