आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाला चला, लग्नाला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुली मैदाने नव वधू-वरांच्या स्वागताला सजलेली.. आशीर्वाद द्यायला मान्यवरांची हजेरी.. मंगलध्वनीच्या सुरात शुभमंगल सावधान म्हणताच, हजारो हात उंचावून अक्षता टाकल्या. त्यासरशी फटाक्यांची आतषबाजी झाली. बँडचा धमाका उडाला..हे दृश्य रविवारी झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यांच्या ठिकाणी होते. शहर आणि जिल्ह्यांत 57 जोडप्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात रेशीमगाठी बांधल्या.

सोलापूर-अक्षय्यतृतीयेच्या पूर्वसंध्येलाच मुहूर्त निघाला आणि सामुदायिक विवाहांचा बार उडाला. बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने अक्कलकोट रस्त्यावरील एस.व्ही.सी.एस. प्रशालेच्या मैदानावर 21 जोडप्यांचा विवाह करण्यात आला. दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी अक्षता सोहळा झाला. होटगी मठाचे मठाधिपती तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी, उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, चिटगुप्पाचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामी, वडांगळीचे पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेच्या वीरतपस्वी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाचे पौरोहित्य नागनाथ शास्त्री, परमेश्वर शास्त्री, सिद्धेश्वर हल्लाळी शास्त्री यांनी केले. ठाण्यातील देवानंद मेनकुदळे, सुवर्णा मेनकुदळे यांनी कन्यादान केले. वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार शिवशरण पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णाराव कुंभार, सहसचिव शांतय्या स्वामी, नगरसेवक शिवानंद पाटील, चंद्रकांत रमणशेट्टी, भीमाशंकर म्हेत्रे आदी उपस्थित होते.

बुरुड समाज
बुरुड समाजाने पहिल्यांदाच मोठय़ा संख्येने वधू-वरांना एकत्रित करून 29 जोडप्यांचा विवाह केला. अकलूजच्या विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात सायंकाळी 6.45 मिनिटांनी झालेल्या या सोहळ्यासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. चित्रदुर्गच्या मठाचे मठाधिपती बसवप्रभू केत्तेश्वर स्वामी, लोकसभेतील शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे, सिनेअभिनेत्री वीणा जामकर हेही उपस्थित होते. समाजातील शहर आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

वडार समाज
बाळीवेशीतील गांधीनाथा रंगजी विद्यालयात सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी वडार समाजातील सात जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला. वडार समाज युवक संघटनांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला. दगड फोडणार्‍या या समाजातील कष्टकर्‍यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विनायक वीटकर, मुख्य संयोजक गौतम भांडेकर यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.

आज 32 विवाह
पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सोमवारी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर 32 जोडप्यांचा सामुदायिक विवाह करण्यात येणार आहे. विणकर बागेत सायंकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी हा सोहळा होईल, असे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत साका यांनी सांगितले. कामगारांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम घेतला आहे. समाजबांधवांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन सचिव दामोदर पासकंटी यांनी केले.