सोलापूर - पूजा गारमेंट्सच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी आदेश देऊनही तब्बल १५ दिवस टाळाटाळ करण्यात आली. याप्रकरणी पूजा गारमेंट्सने दाखल केलेल्या पत्रावर सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पूजा गारमेंट्सप्रकरणी वस्तुस्थिती अहवाल सादर करा तोपर्यंत कार्यवाही थांबवावी, असे आदेश दिले.
बांधकामास विलंब झाल्याप्रकरणी कारवाई थांबली तरी बोगस जागा दाखवून प्रकल्प मंजूर केल्याप्रकरणी कारवाई होणार काय असा प्रश्न आहे. अर्जदार पूजा गारमेंट््सचे अध्यक्ष व्यंकटेश्वर आसादे यांनी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना दिलेल्या निवेदनात पूजा गारमेंट्सवर जिल्हाधिका-यांनी गुन्हा दाखल करण्याविषयी तगादा लावला आहे. सन २०१२ पर्यंतचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून पुढील वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण झाल्याशिवाय गुन्हा नोंद करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात यावेत. प्रकल्प इमारत बांधकामासाठी पाणी वाळू टंचाईमुळे अडचण निर्माण झाली. बांधकामासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात यावा, असे नमूद केले आहे.
यानुसार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी प्रकल्प इमारत बांधकामास विलंब झाल्याबाबत वस्तुस्थिती अहवाल सादर करावा आणि तोपर्यंत कार्यवाही थांबवावी, असे आदेश समाजकल्याण आयुक्तांना दिले आहेत. शिवाय याची माहिती टिपणीद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात यावी, असे आदेश प्रतीवर नमूद केले आहे. आता जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे कोणती भूमिका घेणार हा मुद्दा महत्त्वाचा राहील.