आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्गावर बांधणार वन्यजीवांसाठी भुयारी मार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वेगाने जाणार्‍या वाहनांखाली चिरडून मृत्युमुखी पडणार्‍या वन्यजीवांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुढे सरसावले. पुणे- विजापूर बाह्यवळण मार्गावर दोन किंवा तीन ठिकाणी खास वन्यजीवांना ये-जा करण्यासाठी बोगदा करणार आहेत.

चारही दिशांनी येणार्‍या राष्ट्रीय आंतरराज्य रस्त्यांनी सोलापूर शहर जोडले आहे. रस्त्यांमुळे शहराची प्रगती हे वास्तव आहे. पण, त्याच रस्त्यांवरून ये-जा करणार्‍या भरधाव वाहनांमुळे अनेक निष्पाप वन्यजीव चिरडले जातात. दरवर्षी त्यांची संख्या तीनशेंपेक्षा जास्त आहे. त्याबाबत ‘दिव्य मराठी डीबी स्टार’मध्ये ११ एप्रिलला ‘आमचा जीव कवडीमोल आहे काय?’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. वन्यजीव विभाग, वनविभाग, स्वयंसेवी संस्था त्यामुळे सक्रिय झाल्या आहेत.

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍या वन्यजीवांना वाचवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जनजागृती फलक लावण्याची गरज आहे. तसेच, रस्ते तयार करताना माणसांप्रमाणेच खास वन्यजीवांना ये-जा करण्यासाठी बोगदा (मोरी) आवश्यक असल्याचे, उपाय सुचवले होते.

पुणे-विजापूर हा राष्ट्रीय महामार्गास हॉटेल जंगली येथून बायपास रस्ता काढण्यात येणार आहे. शिवाजी नगर, बसवेश्वर नगर, देगाव, बेलाटी, कवठे, भाटेवाडी, नंदूर, समशापूर मार्गे हत्तूर येथे विजापूर रस्त्यास जोडणार आहे. त्या रस्त्यावर वाहने नागरिकांना ये-जा करण्यासाठी पाच ते सहा ठिकाणी बोगदा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. हिरज, पाथरी, बेलाटी, कवठे परिसरातील राखीव वनक्षेत्रात काळवीटांची संख्या जास्त आहे. त्याचप्रमाणे खोकड, कोल्हे, लांडग्यांची संख्या मोठी आहे. नवीन चारपदरी राष्ट्रीय महामार्ग झाल्यास त्या वन्यजीवांना ये-जा करणे अशक्य आहे.

अभ्यासपूर्वक ठिकाणांची निवड करण्यात येईल
वन्यजीवांचा वावर असलेला परिसर बोगदासाठी सुचवण्यात येईल. भविष्यातील १० ते २० वर्षांनंतरच्या स्थितीचा अभ्यास करून ठिकाणांची निवड होईल. त्यासाठी स्थानिकांसह, अभ्यासक तज्ज्ञांची मदत घेणार आहोत.” राजेंद्रनाले, साहाय्यक मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग

वनविभाग, अभ्यासकांची मदत
पुणे-विजापूर बायपास मार्गावरील वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी स्वतंत्र बोगदा तयार करण्यात येईल. त्यासाठी अभ्यासक वनविभागाची मदत घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव करू. ऑक्टोबरपासून रस्त्याच्या कामास सुरुवात होईल. अडीच वर्षांमध्ये २२ किलोमीटरचा रस्ता पूर्ण होईल.” - पी.बी. इखे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

या पथकाने केली पाहणी
राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरणने वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी स्वतंत्र बोगदा तयार करण्याची अट त्या प्रस्तावामध्ये समाविष्ट केली. त्यानुसार शुक्रवारी वन्यजीव विभागाचे साहाय्यक मुख्य वनसंरक्षक राजेंद्र नाले, मानद वन्यजीव रक्षक डॉ. िननाद शहा, भारत नॅचरल हिस्ट्री सोसायटीमधील वन्यजीव तज्ज्ञ सुजीत नरवडे अभ्यासक अभिजित कुलकर्णी, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक पी. बी. इखे, अभियंता संजय कदम यांच्या पथकाने त्या प्रस्तावित बायपास मार्गाची पाहणी केली. कोणत्या भागांमध्ये वन्यजीवांचा जास्त वावर आहे? कोठे बोगदा करावा? किती उंची लांबी किती असावी? याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली.

पाहणी मार्गावरच मृत कोल्हा
रस्तेअपघात मृत्युमुखी पडणार्‍या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी बोगदा उभारण्याबाबत प्राथमिक सर्वेक्षणासाठी वन्यजीव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक देगाव परिसरातून जात असताना रस्त्याच्या बाजूला अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्युमुखी पडलेला कोल्हा आढळला.खास वन्यजीवांना ये-जा करण्यासाठी उभारण्यात येणार्‍या बोगद्याचा वापर त्या परिसरातील लोकांनी सुरू केल्यास काय करायचे? असा प्रश्न पाहणी दरम्यान उपस्थित झाला. उंची वाढवल्यास पाळीव प्राणी वाहनांची त्यातून वर्दळ वाढेल. उंची कमी ठेवल्यास काळवीटांना अडथळा होईल. इतर देशांत राज्यामध्ये केलेल्या गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.

(फोटो : पुणे-विजापूर बायपास मार्गावर वन्यजीवांसाठी बोगदा उभारण्याबाबत शुक्रवारी प्राथमिक पाहणी करण्यात आली. यावेळी वन्यजीव अभ्यासक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी.)