आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - एकीकडे वाढत्या चोर्यांनी त्रस्त असलेल्या सामान्य सोलापूरकरांना धडकी भरली आहे. तर दुसरीकडे सोलापुरातील वाढलेले गुन्हे ‘नॉर्मल’ असल्याचा निर्वाळा देत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांना एका अर्थाने अभय दिले आहे.
श्री. पाटील शनिवारी सोलापुरात होते. पोलिस आयुक्तालयात त्यांनी अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. पाटील म्हणाले की, सोलापुरात गुन्हे वाढले आहेत. पण, ते नॉर्मल गुन्हे आहेत. कारण आम्ही सर्व प्रकारचे गुन्हे नोंदवून घेतो. त्यामुळे आकडेवारी फुगली आहे. लोकसंख्या, वाहने वाढली. त्यामानाने पोलिसबळ नाही. राज्यात 61 हजार पोलिस भरती होणार असून त्यात प्राधान्याने सोलापूरला पोलिस वाढवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र ‘एटीएस’ सक्षम आहे. अनेक गुन्ह्यांचा उकल करण्यात त्यांना यश आले आहे. सोलापुरात तीन दिवसांपूर्वी दोघा तरुणांना इंदूरच्या एटीएस पथकाने अटक केली. पण, त्यात मोठा वाटा महाराष्ट्र एटीस व स्थानिक पोलिसांचा आहे, असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की, सोलापुरात व्यापक स्वरूपात एटीएसचे काम करण्यासाठी मनुष्यबळ पाहिजे. तसा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडून आल्यास विचार करू, असे ते म्हणाले. 26-11 च्या हल्ल्यानंतर मुंबईतील सुरक्षा सक्षम केली आहे. विशेष तपास पथक नेमले. त्याच धर्तीवर अन्य शहरातही पथक नेमले जाईल. पोलिस भरतीही त्याच पथकासाठी थेट करणार आहोत.
मशिदीसाठी पथक
पोलिस मुख्यालयातील मशिदी इतरांसाठी खुली करण्यास वरिष्ठ अधिकार्यांचे पथक नेमण्यात येईल. आढावा यापूर्वी घेतला आहे. पाहणी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे पाटील म्हणाले.
मतदार चुकत नाही
राजा म्हणजे आपला मतदार. तो कधी चुकत नाही. दिल्लीतील बदलानंतर आम्ही चिंतन करत आहोत. लोकांना चांगलं प्रशासन पाहिजे. आम आदमी पार्टीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर श्री. पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.
पोलिस अधिकार्यांच्या बदल्या
अधिकार्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. तीन वर्षे अथवा दोन वर्षे पूर्ण केलेल्या अधिकार्यांचा बदल्या करायच्या की कसे याबाबत एक समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आला आहे. मुख्यमंत्री लवकरच याबाबत निर्णय घेतील. रखडलेल्या बदल्याही मार्गी लागतील. फौजदार ते उपअधीक्षक,साहाय्यक आयुक्त या अधिकार्यांचा बदल्या पोलिस महासंचालक करतील. पुढील पदांच्या बदल्या मुख्यमंत्री करतील.
आबा उवाच ..
> आदर्श प्रकरणाचा तपशील मंत्रिमंडळात ठरवला जाईल
> माझ्या शासकीय बंगल्यावर किती खर्च आलाय माहिती नाही, मुंबईत चौकशी करू
> मुंबईत महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आहेत
> नवीन पोलिस आयुक्तालयात पहिल्यांदाच श्री. पाटील आले होते.
सुरक्षा, वाढती गुन्हेगारी यावर चर्चा
श्री. पाटील यांनी पोलिस अधिकार्यांची बैठक घेतली. पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, पोलिस अधीक्षक राजेश प्रधान यांच्यासह ग्रामीण, शहर दलातील अधिकारी उपस्थित होते. वाढती गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था याचा आढावा घेतला. पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हेगारी रोखण्याचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.