आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुती फसव्यांची टोळी, भाजपच सेनेला संपवणार - गृहमंत्री आर. आर. पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - महायुतीमधील घटक पक्ष म्हणजे शेतकर्‍यांच्या हिताचे कातडे पांघरुन एकत्र आलेल्या फसव्यांची टोळी आहे. त्यामुळे शेती आणि शेतकर्‍याला कोण वाचवू शकतो याचा विचार करा, असे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी करकंब (ता.पंढरपूर) येथे केले. महायुती टिकणार नसून भाजपच शिवसेनेला संपवेल, असे भाकितही त्यांनी वर्तविले.

माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री दिलीप सोपल होते. पाटील म्हणाले, दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांची मान ताठ ठेवायची असल्यास मोहितेंना दिल्लीत पाठवा. भाजप नेते नितीन गडकरी यांची राज ठाकरेंशी भेट, राज यांच्याकडून शिवसेनेच्या विरोधातच उमेदवार देण्याची भूमिका यातूनच भाजप भविष्यात शिवसेनेला संपविणार असल्याचे दिसून येते.

दलित बांधव हा रेशीमबागेतील हेडगेवारांच्या स्मारकावर कधीही नतमस्तक होत नाही. तो नागपूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमारे नतमस्तक होतो. मात्र, रिपाइंचे रामदास आठवले यांची वाटचाल ही डॉ. आंबेडकरांच्या नव्हे तर जातीयवादी शिवसेनेच्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

सदाभाऊ खोतांकडून फसवणूक
महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी धुळ््यातील देवकीनंदन डेअरीच्या शेतकर्‍यांची फसवणूक केली. त्यांना शेतकर्‍यांचे काही देणेघेणे नाही. प्रत्येक हंगामात ऊसदर आंदोलन पेटवून त्याच्या भांडवलावर आपली पोळी भाजून घेण्याचा त्यांचा उद्योग आहे. यंदा दीड महिने कोल्हापूर भागातील कारखाने या आंदोलनामुळे बंद होते. त्याची किंमत आता शेतकर्‍यांना सोसावी लागत आहे. कारण ऊसतोडणीचा खर्च शेतकर्‍यांना करावा लागत असल्याचे पाटील म्हणाले.

स्वाभिमानीच्या नेत्यांवर बेकारीची पाळी
येत्या काळात राज्य शासन ऊसदर ठरविण्यासाठी त्रयस्थ समिती स्थापणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी ऊसदर आंदोलन होणार नाही, याची आम्ही दक्षता घेणार आहोत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर निश्चित बेकारीची पाळी येणार असल्याचे पाटील म्हणाले.