आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना पुढे करून भाजपचा खोटा प्रचार - आर. आर. पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा - लोकसभा निवडणुकीत भाजप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पुढे करून खोटा प्रचार करत असल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. तसेच ही लढाई विचारांची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा देशाच्या अखंडतेला, एकात्मतेला व विकासाला छेद देणारा आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेला तो परवडणारा नसल्याचेही त्यांनी सांगितले.

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, ‘काँग्रेस व राष्ट्रवादीने नेहमी विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच आज देश सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहे. अन्नधान्याबाबत देश स्वयंपूर्ण बनला आहे. देशाची अन्नाची गरज भागवून जगातील 18 देशांना अन्नधान्याचा पुरवठा करत आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी 100 हजार कोटींचे कर्जवाटप केले. पूर्वी ती 86 हजार कोटी होती. शून्य टक्के व्याजदराने एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. त्यामुळे राज्यात समतेचा विचार व विकासाची गती टिकवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा, असेही ते म्हणाले. या वेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते, माजी आमदार जयवंत जगताप, रश्मी बागल, विलास घुमरे व शिवलिंग सुकळे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी आमदार श्यामल बागल, माजी आमदार जयवंत जगताप यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, रश्मी बागल, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, नगराध्यक्षा विद्या चिवटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, तात्या मस्कर, कन्हय्यालाल देवी, रामेश्वर माशाळ, डॉ. प्रदीप जाधव, माजी नगराध्यक्षा पुष्पा फंड, डॉ. हरिदास केवारे, सुनील सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकर्‍यांना फसवणारे ऊसदर कसा मिळवून देतील
महायुतीकडून माढ्यातून निवडणूक लढवत असलेले सदाभाऊ खोत यांनी घुळे येथे शेतकर्‍यांची फसवणूक केली. शेतकर्‍यांच्या नावावर बोगस कर्ज काढून पैसा गोळा केला. यासंदर्भातील खटला न्यायालयात सुरू आहे. शेतकर्‍यांना फसवणारे त्यांच्या उसाला दर कसा मिळवून देतील याचा विचार शेतकर्‍यांनी करावा, असेही गृहमंत्री पाटील म्हणाले.