आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Race Within Nationalist Congress For City President Post

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्षासाठी रस्सीखेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शहराध्यक्ष बनण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.रविवार (दि. ५) रोजी पक्ष पदाधिकारी निवड करण्यासाठी बैठक होत आहे. शहर अध्यक्ष पदासाठी अनेक नावे पुढे येत आहेत. विद्यमान शहराध्यक्ष मनोहर सपाटे यांच्याकडे असलेले पद काढून घेण्यासाठी पक्षातील दुसरा गट सक्रिय प्रयत्न करताना दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीत तिकीट िदले नाही यासाठी महेश गादेकर यांच्याकडील शहराध्यक्ष पद माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याकडे देण्यात आले. मात्र, त्यानंतर चार महिन्यांत राष्ट्रवादी प्रदेशकडून पदाधिकारी बदलाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. पक्ष निरीक्षक प्रकाश गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल रोजी शिवाजी प्रशालेत याबाबत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत ब्लॉक अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष प्रदेश सदस्यांची निवड होणार आहे. याच बैठकीत शहराध्यक्ष बदलाची मागणी होऊ शकते.

शहराध्यक्ष होण्यासाठी जातीचा फॅक्टरही महत्त्वाचा मानला जाणार आहे. मनपातील स्थायी समिती सभापती पद्माकर काळे, उपमहापौर प्रवीण डोंगरे ही पदे मराठा समाजाकडेच असल्याने इतर समाजाला संधी मिळावी, अशी इच्छुकांची मागणी आहे. यातूनच नगरसेवक दीपक राजगे, प्रवक्ते दिनेश शिंदे, परिवहनचे माजी सभापती आनंद मुस्तारे वा पूर्व भागात पक्षाची बांधणी करण्यासाठी जनार्दन कारमपुरी यांच्या मुलाला संधी द्यावी, अशी मागणी होऊ शकते. शहर उत्तरमधून विधानसभा निवडणुकीत मनोहर सपाटे यांचे नाव जाहीर झाले होते. मात्र, शहराध्यक्ष गादेकर यांनी पक्षाकडून आलेला एबी फॉर्म स्वत:साठी वापरून उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणुकही लढवली होती. या प्रकाराने संतप्त सपाटे यांनी पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या जाहीर सभेतच याचा पुनरुच्चार करत नाराजी व्यक्त केली होती. नाराजी दूर करण्यासाठी पक्षाध्यक्ष पवार यांनी सभेतील भाषणात शहराध्यक्ष म्हणून सपाटे यांचे नाव जाहीर केले. यामुळे सपाटे यांची नाराजी दूर झाली असली तरी पक्षाला लाभ झाला नसल्याचे शहर पदाधिकारी यांचे म्हणणे आहे.

सपाटे हे कट्टर पवार समर्थक...
खुद्दपक्ष प्रमुख शरद पवार यांनी मनोहर सपाटे यांचे नाव जाहीर केले होते, शिवाय त्यांचा कालावधी अद्याप पूर्ण झाला नाही. यामुळे शहराध्यक्ष सपाटे यांचे पद सध्यातरी शाबूत आहे. मात्र, शहर राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण पाहता नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी होऊ शकते. शहराध्यक्ष मनाहेर सपाटे यांना वरिष्ठ पातळीवरूनही आशीर्वाद असल्याने पदावरून हटवणे मुश्किल होऊ शकते.

सोपलांची भूमिका निर्णायक...
पक्षानेमाजी मंत्री आमदार दिलीप सोपल यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. शहराध्यक्ष निवडीत सोपल यांची भूमिका निर्णायक असली तरी, या प्रक्रियेत ते फारसे लक्ष घालतील याची शक्यता खूपच कमी आहे. कारण, आजपर्यंत त्यांनी पदाधिकारी निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसत नाही. यामुळे सपाटे यांच्या पाठीशी राहतील की अन्य कार्यकर्त्यास संधी देतील, ते एप्रिलच्या बैठकीतच ठरेल.