आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मित लॉजवर छापा; पोलिसांना धक्काबुक्की

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मेकॅनिकी चौकातील अस्मित लॉज येथे मटका व जुगार चालू असल्याच्या माहितीवरून छापा टाकण्यास गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांशी तेथील महिलांनी धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नवीवेस पोलिस चौकातील वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले होते. तिघा महिलांना ताब्यात घेण्यात आले असून बावळे व रोडगे फरार झाले असल्याचे पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी सांगितले.

या घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील, पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे, साहाय्यक पोलिस उपायुक्त खुशालचंद बाहेती, गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन कौसडीकर, पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांच्यासोबत कमांडो पथकासह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता.

नितीन कौसडीकर, महिला फौजदार बोधे यांच्यासह पथक अस्मित लॉज येथे छाप्यासाठी गेले होते. तेथील महिला समोर येऊन पोलिसांशी धक्काबुक्की करीत कामात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. काही महिला आक्रमकपणे महिला फौजदार बोधे यांच्या अंगावर धावत येऊन धक्काबुक्की केली. त्यानंतर 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत नवी वेस पोलिस चौकीच्या परिसरात पोलिसांचा ताफा ठाण मांडून होता. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांना फौजदार चावडी पोलिस ठाण्याला घेऊन जाण्यात आले. त्यानंतर मात्र तणाव थोड्या प्रमाणात निवळला. फौजदार चावडी पोलिसात रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.