आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. अन् ‘हुसेनसागर’चे प्रवासी बचावले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गुरुवारी पहाटे पावणेसहाची वेळ. स्थळ सोलापूर रेल्वे स्थानक. मुंबईहून हैदराबादकडे निघालेली हुसेनसागर एक्स्प्रेस दाखल झाली. तांत्रिक विभागाचे कर्मचारी नेहमीप्रमाणे तापमान मोजणार्‍या साधनाने (टेम्परेचर गन) गाडीच्या चाकाची माहिती घेत होते. गाडी सुटण्यास आणखी 5 ते 10 मिनिटांचा अवधी होता, कर्मचारी अन्य डब्यांची चाके तपासून पाठीमागून चौथ्या क्रमांकावर असलेल्या द्वितीय श्रेणीच्या वातानुकूलित डब्यासमोर आला. तेथे बाहेरून सामान्य दिसणार्‍या चाकाची स्थिती, ही आतून अत्यंत धोकादायक बनली होती. दोन चाकांना जोडणारा अँक्सेल तापलेला होता. तो गरम झाल्याने तुटण्याच्या बेतात होता. अशीच जर गाडी पुढे गेली असती तर फार मोठा रेल्वे अपघात होऊन मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली असती. पण, रेल्वे कर्मचार्‍यांच्या प्रसंगावधाने प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले.

एक्स्प्रेसचे फलाट क्रमांक 3 वर आगमन झाले. यावेळी मेकॅनिक ल विभागातील मुकुंद सिदराम याने तपासणी सुरू केली. साधारणपणे चाकाचे तापमान 50 अंश सेल्यिअस असणे गरजेचे असते. त्याच्याहून अधिक गेल्यास ते धोकादायक ठरू शकते. सोलापूर स्थानकावर जेव्हा याची चाचपणी करण्यात आली त्यावेळी चाकाचे तापमान हे 105 अंश सेल्सिअस गेले होते. त्यांना धोक्याची चाहुल लागली. लागलीच याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. घटना गंभीर असल्याने रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. बिघाड झाला तो डबा वेगळा करण्यात आला. त्यातील प्रवाशांना उतरवण्यात आले. यावेळी अन्य एक वातानुकूलित डबा जोडण्यात आला. सुमारे दोन तास थांबा घेऊन गाडी पुन्हा मार्गस्थ झाली. ,

हे वेळीच लक्षात आले नसते तर
रेल्वे प्रशासनाच्या वेळीच हे लक्षात आले नसते तर हुसेनसागर एक्स्प्रेसचा अपघात अटळ होता. अँक्सेल तुटल्याने दोन चाके विभागली गेली असती. यामुळे तो डबा तर उलटलाच असता शिवाय पुढचे दोन व पाठीमागचे दोन असे मिळून पाच डबेदेखील उलटून मोठा अपघात झाला असता. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली असती.

पुरस्कारासाठी प्रस्ताव
मुकुंद सिदराम या कर्मचार्‍याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. त्यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे. त्यांना डीआरएम अँवॉर्ड मिळावा म्हणून प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.’’ सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय दळणवळण व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे