सोलापूर - प्रवासात एखादे वाहन रस्ता चुकल्याच्या घटना नित्यानेच घडत असतात. मात्र, चक्क एखादी रेल्वे रस्ता चुकून दुसरीकडे जात असल्याची बातमी ऐकून कदाचित
आपल्याला धक्का बसेल. सोलापूर विभागात ही घटना बुधवारी सकाळी घडली. स्थानकावरील व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे जी मालगाडी लातूरला जाणे अपेक्षित होते तिने सोलापूरकडे प्रयाण केले. वडशिंगे रेल्वेस्थानकाजवळ गाडी आली असता रेल्वे नियंत्रण कक्षातील कर्मचा-यांच्या हा प्रकार लक्षात आला. प्रसंगावधान राखत या कर्मचा-यांनी तातडीने सगळी सूत्रे हाती घेत ही गाडी कुर्डुवाडीकडे पाठवण्याचा आदेश दिला. सुदैवाने या घटनेत कोणताही अपघात झाला नसला तरी मालगाडीला चार तासांहून अधिक उशीर झाला व तेवढे डिझेल जळाल्याने रेल्वेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
कुर्डुवाडीच्या व्यवस्थापकाने दिला संदेश
> मुंबईहून सिकंदराबादच्या दिशेने निघालेल्या मालगाडीत ‘सीएमसीएन’चे कंटेनर होते. ही गाडी दौंडवरून कुर्डुवाडीला आली. तिला पुढे लातूरमार्गे सिकंदराबादला जायचे होते. सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांनी ही गाडी कुर्डुवाडी स्थानकावरून लातूरकडे जाणे अपेक्षित होते. मात्र, स्थानकावरील ऑपरेटिंग विभागाच्या व्यवस्थापकाने गाडी लातूरऐवजी सोलापूरच्या दिशेने जाण्याचा संदेश गाडीच्या गार्डला व लोको पायलटला दिला. त्यानुसार गाडी निघाली.
> कुर्डुवाडी- सोलापूरच्या ट्रॅकवर गाडी पुढे आठ किमी आल्यानंतर वडशिंगे स्थानकजवळ पोहोचली. नियंत्रण कक्षातील कर्मचा-यांना पूर्वसूचनेशिवाय आलेली ही गाडी पाहून धक्का बसला. त्यांनी तातडीने गार्डशी वॉकीटॉकीवरून संपर्क साधत गाडी थांबवण्याचे आदेश दिले. सकाळी ९.१० वाजता वडशिंगे येथे मालगाडीपासून लोको (इंजिन) वेगळे करण्यात आले. पुन्हा टर्नओव्हरवरून दिशा बदलून मालगाडी साडेदहा वाजता कुर्डुवाडीकडे रवाना झाली.
चौकशीचे आदेश
घडलेली घटना गंभीर आहे. त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळलेल्या कर्मचा-यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- नरपत सिंह, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, रेल्वे प्रशासन