आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Platform News In Marathi, Solapur Railway Platform Issue, Divya Marathi

रेल्वे डबा व फलाटातील अंतरामुळे अपघाताचा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वे डब्यात चढताना होणार्‍या अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. तर काही जणांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. हा सर्व प्रकार रेल्वे फलाटाची कमी असलेल्या उंचीमुळे घडत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. रेल्वे डबा व फलाट यांच्यात सुरक्षित अंतर असणे आवश्यक आहे. पण, भारतातील बहुतेक रेल्वे फलाटांची उंची कमी असल्याचे दिसून येते. सोलापूर रेल्वे विभागातही हा प्रकार पाहायला मिळतो. या तांत्रिक चुकीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षभरात सोलापूर विभागात झालेल्या अपघातात 84 प्रवाशांना जीवाला मुकावे लागले आहे.

शहर मुंबई असो की सोलापूर दरवर्षी शेकडो प्रवासी रेल्वेने प्रवास करताना रेल्वे डबा ते फलाट यामध्ये असणार्‍या मोकळ्या जागेत अडकून अपघाताला बळी पडतात. डबा व फलाट यांच्यातील अंतर किती असावे याला र्मयादा आहे. प्रवाशांना डब्यात सुरक्षित चढता यावे अशी र्मयादा रेल्वे बोर्डाने आखून दिली आहे. डबा ते फलाट यातील अंतर 5 इंचपेक्षा अधिक नसावे, असे रेल्वेचा नियम सांगतो. सोलापूर रेल्वे स्थानकावरील फलाट व डब्यातील अंतर साडेआठ सेमी आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा साडे तीन इंच अधिक आहे. या अंतराच्या अडथळ्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. दुर्दैवाने या प्रश्नांवर प्रवासी संघटना तसेच रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधीपैकी कुणीच काही बोलत नाही.

मुंबईत लोकलने प्रवास करताना मोनिका मोरे हिचा अपघात झाला आणि रेल्वे फलाटाची उंची याबाबतचा विषय संपूर्ण देशात चर्चिला गेला. केवळ मुंबईपुरता हा विषय नसून सोलापुरातही याचे परिणाम भोगावे लागतात. दरवर्षी सोलापूर रेल्वे विभागात रेल्वेखाली, डब्यातून खाली पडणे, गाडी पकडताना हात निसटून पडल्याच्या घटना अनेकदा घडतात. सोलापूर रेल्वे प्रशासनातर्फे फलाटाची उंची नियमाप्रमाणे असल्याचे सांगण्यात येते, पण प्रत्यक्षात फलाटाचे अंतर 5 इंचापेक्षा अधिक आहे.

अपघात टाळण्यासाठी हे करा
अनेकदा प्रवासी गाडी सुटताना पळत जाऊन गाडी पकडतात. यात अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी गाडी सुटण्यापूर्वी 20 मिनिटे स्थानकावर असावे. गाडी निघण्यापूर्वीच डब्यात चढा. प्रशासनाने फलाटाची उंची वाढवण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले पाहिजे. काम सुरू होत आहे.

सोलापुरात शक्य
आंदोलनाची दखल घेऊन मुंबईत फलाटाची उंची वाढवण्यात येत आहे. मुंबईप्रमाणे सोलापुरातही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फलाटाची उंची वाढवण्यात यावी.

अंतराचे कारण..
रेल्वेगाडी फलाटावर आल्यानंतर किंवा फलाटावरून निघाल्यानंतर त्याचे डबे फलाटाला घासू नये. त्यासाठी रेल्वे प्रशासन डबा व फलाट या दरम्यान विशिष्ट अंतर ठेवते.

काय सांगतो रेल्वे नियम
लोकल व लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी फलाटची रचना वेगवेगळी असते. मुंबई आणि उपनगरीय भागात लोकलसाठी वेगळे आणि मेल, एक्स्प्रेस अन्य गाड्यांसाठी वेगळे फलाट बांधण्यात येतात. फलाट बांधताना ट्रॅकच्या मधोमध भाग हा सेंटर पकडला जातो. त्याच्यापासूनचे अंतर मोजून फलाटाची बांधणी केली जाते. ट्रॅकचा मधल्या भागापासून कमीत कमी 1670 मिलिमीटर ते जास्तीत जास्त 1680 मिलिमीटर अंतरावर फलाट उभारण्यात येते. डब्याचा दरवाजा ते फलाटाचे अंतर 5 सेमी इतके असावे. मात्र, सोलापूर स्थानकावरील अंतर तब्बल साडेतीन इंचने जास्त आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

फलाटाचे तीन प्रकार
भारतीय रेल्वेत लो लेवल फलाट, मिडल लेवल आणि हाय लेवल फलाट असे तीन प्रकारचे फलाट आहेत. स्थानकाच्या दर्जानुसार रेल्वे फलाटाची उभारणी केली जाते. लो लेवलाच रेल लेवल फलाट साधारण उंचीचा असतो. मिडल लेवल फलाट 450 मिमी उंचीचा असतो. तर हाय लेवल फलाट 760 ते 840 मिमी उंचीवर असतो. सोलापूर रेल्वे स्थानक हे ए वन दर्जाचे आहे. त्यामुळे स्थानकावर हाय लेवल फलाट उभारण्यात आले आहे. डबा व फलाटाचे अंतर 5 इंच असणे आवश्यक आहे. परंतु सोलापूर रेल्वे स्थानकावर नियमांचे पालन होताना दिसत नाही.

उंची वाढवल्यास अपघात कमी होतील
प्रवाशांच्या सोयीसाठी फलाटाची उंची वाढविली पाहिजे. किंबहुना फलाट आणि डब्याचा दरवाजा यात कोणताही गॅप असता कामा नये. या गॅपमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. केवळ महत्त्वाच्याच स्थानकावर फलाट न बांधता अन्य साध्या स्थानकावरही फलाट बांधले गेले पाहिजेत. संजय पाटील, उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा प्रवासी संघ.

..अन्यथा आंदोलन करण्यात येईल
रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना गर्दीच्या वेळी डब्यातून उतरणे- चढणे हे अनेकदा धोकादायक ठरते. त्यामुळे प्रशासनाने फलाटाची उंची वाढवावी. अन्यथा, यासाठी सोलापुरात आंदोलन उभे करावे लागेल. उपेंद्र ठक्क र, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य

फलाटाची उंची वाढवण्यासाठी मुंबईप्रमाणे सोलापुरातही आंदोलन
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईत आंदोलन करून फलाटाची उंची वाढविण्यास भाग पाडले. हा प्रश्न केवळ मुंबईपुरताच र्मयादित नसल्याने मी हा प्रश्न पार्लमेंट कमिटीसमोर मांडला आहे. येत्या महिनाभरात यावर उत्तर येणे अपेक्षित आहे. मुंबईत काही रेल्वे फलाटाची उंची वाढवण्यात येत आहे. मुंबईप्रमाणे गरज पडल्यास सोलापुरातही फलाटाच्या उंचीसाठी आंदोलन करण्यात येईल. किरीट सोमय्या, भाजप नेते

सोलापुरात मोजणी करावी लागेल
रेल्वेच्या गाइडलाइनप्रमाणे सोलापूर रेल्वे स्थानकावर फलाट बांधण्यात आले आहेत. रेल्वे फलाटाची उंची वाढविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेतला जातो. डबा आणि फलाट याच्यातील अंतर 5 इंच असावे. अधिक असल्यास त्याची मोजणी करावी लागेल. जॉन थॉमस, विभागीय रेल्वे व्यवस्थापक.

उंचीबाबत कळविले आहे, निर्णय अपेक्षित
फलाटाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मी या संदर्भात मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली आहे. प्रश्नांचे गांभीर्य सांगितले. याचा अभ्यास करून निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. हर्षद मोरे, मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य