आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाल्यामुळे रेल्वे रुळ धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - प्रभाग क्रमांक 49 येथील हत्तुरे वस्ती येथील लक्ष्मी मंदिरजवळील पुलाच्या पाण्याचा प्रवाह बदलण्यात आला आहे. रेल्वे रुळापासून लांब असलेला पाण्याचा प्रवाह रुळाच्या अगदी जवळ करण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढला की रेल्वे रुळाला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाला याबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.


रेल्वे रुळ कुठेही असो रुळाच्या दोन्ही बाजूंनी 25 मीटरपर्यंत काहीही बांधकाम किंवा पत्र्याचा शेड मारता येत नाही, असे नियम असताना अनेक ठिकाणी रुळाला चिटकूनच मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढण्याची मोहीम काही ठिकाणी रेल्वे विभागाने सुरू केली आहे. मजरेवाडीकडून येणारा नैसर्गिक नाला हत्तुरे वस्ती येथील लक्ष्मी मंदिराजवळ पुलाखालून जातो. हा पूल अनेक वर्षापूर्वी ब्रिटिशांनी बांधला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळेच ब्रिटिश काळापासून नाल्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या नाल्यात मुरूम टाकून तो प्रवाह पूर्णपणे बंद करून रेल्वे रुळाच्या बाजूने नाल्याचा नवीन प्रवाह तयार करण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यास रेल्वे रुळाला धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे काहींनी रेल्वे विभागाकडे तक्रार करूनही रेल्वे विभागामार्फत अद्यापही त्या जागेची पाहणी करण्यात आली नाही.


त्वरित पाहणी करू
नाल्याच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याची तक्रार आली आहे. संबंधित अधिकार्‍यांना सांगून जागेची पाहणी करायला लावतो. जर असे असेल तर जो कोणी असे केला असेल त्याला नोटीस बजावू. सुशील गायकवाड, रेल्वे प्रबंधक


पाहणी करून बोलू
नाल्याच्या प्रवाहाबाबत काही माहिती नाही. त्याची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सांगतो. पाहणी केल्यानंतर नेमकी परिस्थिती काय आहे हे समजल्यानंतर मग कारवाई करू. सुभाष सावस्कर, नगरअभियंता महापालिका