आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक लेनसाठी आराखडा तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे स्टेशन आवारातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी नाशिकमधील रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर वाहतूक लेन उभारण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखेने आराखडा तयार करून रेल्वे प्रशासनाला िदला आहे, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

रेल्वे सुरक्षा आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), रेल्वे प्रशासन यांच्याकडून परिसराची पाहणी झाली आहे. त्यानुसार आराखडा तयार करून देण्यात आला आहे. याबाबत लवकरच काम सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय सिध्देश्वर आणि इंद्गायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस गाड्या आल्यानंतर रेल्वे स्टेशन चौकात वाहतुकीची कोंडी होते. यावेळी वाहतूक पोलिसांकडून नियोजन होत नाही. रिक्षांचा बेशिस्तपणा आणि फूटपाथवरील खाद्य विक्रेत्यांचे अतिक्रमण कारणीभूत आहे.

सरस्वतीचौक, शिवाजी चौक ते पुणे नाका मार्गावर वाहतूक समस्या कायम आहे. शिवाजी चौक ते नवी वेस या मार्गावर बॅरीकेडिंग लावण्याची मागणी वाहतूक शाखेने महापालिकेला केली आहे. शिवाय शिवाजी चौकातील अतिक्रमण काढणे, एकेरी मार्गाबाबत फलक लावणे, ही कामे मनपाकडून अपेक्षित आहेत. ती पूर्ण झाली नाहीत. हॉटेल सिटी पार्कसमोर लोखंडी बॅरीकेडिंग लावण्यात आले आहे. त्याठिकाणी कायमस्वरूपी बॅरीकेडिंग लावण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. तेही काम पूर्ण झाले नाही. अनेक चौकातील सिग्नलही नादुरुस्त आहेत. याबाबत श्री. शिर्के म्हणाले, हॉटेल सिटी पार्कसमोर कायमस्वरूपी बॅरीकेडिंग लावण्यासाठी, एकेरी मार्गासाठी नवी वेस ते शिवाजी चौक मार्गवर बॅरीकेडिंग पाहिजे, अतिक्रमण काढण्यासाठी सूचना दिल्या आहेत. लेखी पत्र दिले आहे. मनपाने ही कामे करून द्यावीत.

काय आहे लेन?
स्टेशन आवारात सध्या रिक्षासांठी लेन (वाट) आहे. आणखी दोन लेन होणार आहेत. बाहेरहून येणारे प्रवासी कार अथवा रिक्षातून येतात. त्या वाहनांना लेन असेल. प्रवासी उतरल्यानंतर ते थेट लेनमधून बाहेर पडतील. दुसरा लेन पायी जाणार्‍या प्रवाशांसाठी असेल. प्रवेशव्दाराजवळ अडथळे लावल्यास कायमस्वरूपी अन्य वाहनांना प्रवेश बंद असेल. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशी संकल्पना आहे.