आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway, Talathi, Phd Exam Student Absent In Solapur

अकरा हजार जणांनी मारली परीक्षेला दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - परीक्षेचा दिवस ठरलेल्या रविवारी 26 हजार परीक्षार्थींपैकी तब्बल 11 हजार विद्यार्थ्यांनी गैरहजेरी लावली. पीएच.डी.च्या परीक्षेत चुका आढळल्या तर तलाठी परीक्षेला 1165 जणांनी दांडी मारली. असे असले तरी तलाठी परीक्षेत पहिल्यांदाच उत्तरपत्रिकेबाबत पारदर्शकता पाळण्याचा प्रयत्न केला. रेल्वे परीक्षेसाठी परराज्यातून आलेल्यांची संख्या जास्त असल्याने इंद्रायणी एक्स्प्रेस फुल्ल धावली.

रेल्वेच्या विविध पदांसाठी रेल्वे भरती मंडळ मुंबईच्या वतीने रविवारी सोलापुरात परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी भारताच्या विविध भागातून परीक्षार्थी सोलापुरात दाखल झाले होते. 15 हजार 065 विद्यार्थी परीक्षेस बसणार होते. मात्र 18 केंद्रांवर फक्त 4817 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जवळपास 10 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम, सिद्धेश्वर प्रशाला, दयानंद कॉलेज, पानगल हायस्कूल या ठिकाणी परीक्षा झाल्या. अतिरिक्त रेल्वे विभागीय व्यवस्थापक के. मधुसूदन यांच्या नियंत्रणाखाली 25 वरिष्ठ अधिकार्‍यांनी केंद्रावर जाऊन पाहणी केली.

मराठी माणूस कधी येणार ट्रॅक वर
रेल्वेत मराठी माणसाला जागा नाही म्हणत अनेक मराठी तरुण रेल्वेच्या नावे बोटे मोडतात. परीक्षेचा अर्ज भरूनही उपस्थित न राहण्याचा प्रकार रविवारी दिसून आला. सोलापुरात पार पडलेल्या परीक्षेला बोटावर मोजता येतील एवढे मराठी तरुण होते. उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, छत्तीसगड आदी राज्यांतून विद्यार्थी आले होते. त्यांनी सोलापुरात येऊन परीक्षा दिली. मराठी तरुण आजही रेल्वेच्या परीक्षेपासून दूर असलेला दिसला.

पेट परीक्षेत पुन्हा चुकांची भेट
सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश परीक्षा नेहमीप्रमाणेच रविवारीही गोंधळात पार पडली.
परीक्षा केंद्रातच.. ये हॅलो.. गप्प राहा.. अशी भाषा वापरली गेली. याला एका विद्यार्थ्याने आक्षेप घेतला.
वालचंद महाविद्यालयात घेण्यात आली परीक्षा. 982 परीक्षार्थी होते. दुपारी 12 ते 2 या वेळेत होती परीक्षा.
वर्गावर्गात परीक्षा पद्धतीबाबत गोंधळ आणि तक्रारीचा सूर उमटत होता.

अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी
जनरल परीक्षा केवळ इंग्रजी माध्यमातूच घेतली गेली, प्रo्नपत्रिकेत दोन चुका होत्या.
कोणत्या माध्यमातून परीक्षा द्यायची याबद्दलचा विद्यार्थ्यांचा हक्क डावलला गेला. त्यामुळे यूजीसीच्या या नियमांचेही उल्लंघन झाले. एक हजार रुपये परीक्षा फी घेऊनही विद्यापीठाने कार्बन उत्तरपत्रिकांची सोय केली नाही.

पंढरपूर येथील राजेश कोरे यांनी तलाठी पदासाठी दुसर्‍यांदा परीक्षा दिल्याचे सांगून इंग्रजी, बुद्धिमत्ता व गणिताचे प्रश्न क्लिष्ट होते, बाकी पेपर सोपा असल्याचे सांगितले. तलाठी पदासाठी मी पहिल्यांदाच पेपर दिला असून काही प्रश्न गोंधळात टाकणारे होते. बाकी सर्व पेपर सोपा असल्याचे सांगली येथील अजित माळी यांनी सांगितले.

अशी पार पडली परीक्षा
तलाठी पदाच्या परीक्षेला 1165 जण गैरहजर
तलाठी पदासाठी शहरातील 32 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली.
10 हजार 400 पैकी 9 हजार 235 जणांनी परीक्षा दिली तर 1165 जण गैरहजर राहिले.
सकाळी 11 ते 2 या वेळेत परीक्षा. जिल्हा प्रशासनातर्फे 900 कर्मचार्‍यांची नियुक्ती होती.

आधीच सूचना दिली होती
सोलापूर विद्यापीठाने रविवारी घेतलेला पेट परीक्षेचा जनरल पेपर हा इंग्रजीतूनच घेण्यात येईल, अशी सूचना पूर्वीच उमेदवारांना दिली गेली होती. भाषा विषयांसाठीची प्रश्नपत्रिका ज्या त्या भाषा माध्यमातून काढली.’’ डॉ. दादासाहेब साळुंखे, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ

तिकीट खिडक्यावर लांब रांगा
स्थानकावरील करंट तिकीट बुकिंग ऑफिससमोरदेखील मोठय़ा रांगा लागल्या होत्या. काही जणांनी कालच परतीचे तिकीट काढले होते. ज्यांनी काढले नव्हते त्यांना चांगलीच धावपळ करावी लागली.