आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानक आरक्षण केंद्रातून दररोज सरासरी 1800 आरक्षित तिकिटे काढण्यात येतात. विभागात ही संख्या सहा हजार आहे. सोलापुरातील खासगी केंद्रांतून दररोज सात हजार आरक्षित तिकिटे काढली जातात. ई-बुकिंगच्या मागणीचा यावरून अंदाज यावा. कमी वेळेत तिकीट मिळत असल्याने अनेकांचा ओढा एजंटांकडे आहे. एका तिकिटामागे हे एजंट 50 ते 100 रुपये अतिरिक्त घेतात. हे रेल्वे नियमांचे उल्लंघन आहे.
सोलापूर येथे 70 ई-तिकीट सेंटर - सोलापूर येथे सुमारे 70 वर ई-तिकीट सेंटर आहेत. यात रेल ट्रॅव्हल सर्व्हिस देणारे दोन एजंट आहेत. रेल ट्रॅव्हल म्हणजे जे घरी येऊन आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आरक्षित तिकीट देतात. यासाठी काही एजंट पहाटेपासूनच रेल्वे आरक्षण केंद्रात बसलेले असतात. तत्काळ तिकिटे मिळवण्यावर यांचा अधिक भर असतो. कारण, इतर तिकिटांच्या तुलनेत त्यांना तत्काळ तिकिटामधून अधिक उत्पन्न मिळते. याचा फटका प्रवाशांना बसतो.
रोजचे 19 लाखांचे उत्पन्न - ई-तिकीट माध्यमातून सोलापुरात दररोज 19 लाखांचे उत्पन्न जमा होते. केवळ सोलापूर शहरात सात हजारांहून अधिक ई-तिकिटे काढली जातात. रेल्वे आरक्षण केंद्रातून 1800 तिकिटे काढण्यात येतात. यापैकी 60 ते 70 टक्के वेटिंग असतात. कारण, एजंटांकडून ती अगोदरच बुक केलेली असतात. रोजचे सोलापूर आरक्षण केंद्रचे सरासरी उत्पन्न सहा लाख 10 हजार रुपये आहे.
14 आरक्षण केंद्रे - सोलापूर रेल्वे विभाग एक हजार क्षेत्रफळात पसरलेला असून या विभागांतर्गत 14 आरक्षण केंद्रे आहेत. यात सोलापूर, कुडरुवाडी, दौंड, गुलबर्गा, अहमदनगर, वाडी आदी रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. क्षेत्रफळाचा विचार केल्यास विभागातील आरक्षण केंद्रे वाढवण्याची गरज आहे.
तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी 2002 मध्ये नागरिकांना घरबसल्या रेल्वे तिकीट काढता यावे म्हणून ई-तिकीट प्रणाली अमलात आणली. त्यावेळी पहिल्या दिवशी भारतातून केवळ 27 ई-तिकीट काढण्यात आले होते. आज हा आकडा पाच लाखांवर पोहोचला आहे. घरबसल्या तिकीट मिळत असल्याने प्रवाशांना याचा फायदा होतच आहे. मात्र, गैरफायदाही अनेक एजंट घेत आहेत. रेल्वेचे आरक्षण केंद्रही त्यांच्या सोबतीला असल्याने सोलापूर आरक्षण कें द्रातून आरक्षित तिकीट मिळणे दुरापास्त झाले आहे. एजंटांनी तत्काळ आरक्षित तिकीटदेखील गिळंकृत केल्याने अनेक प्रवासी वेटिंगवर आहेत.
तक्रार असल्यास संपर्क साधा - प्रवाशांच्या सोयीसाठी ई-तिकीट प्रणाली अंमलात आणली. मात्र, त्याचा गैरवापर होताना दिसत आहे. एजंटांकडून होणारा तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कठोर पावले उचलत आहे. प्रवाशांना वेठीस धरणारे एजंट आणि सेंटरविरुद्ध कारवाई केली आहे. प्रवाशांची तक्रार असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.’’ सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक
एजंटांची बनवाबनवी - काही एजंट तिकिटांचे आरक्षण करताना गैरप्रकार करतात. नुकताच रेल्वे प्रशासनाने हा प्रकार उघडकीस आणला. तीन प्रवाशांना एकच पीएनआर क्रमांक देण्यात आला होता. हे तीन प्रवासी वेगवेगळे होते. त्यांची तिकिटे मात्र एकाच पीएनआरवर काढण्यात आली होती. दोन तिकिटांची बचत करण्याचा त्यांचा डाव होता.
प्रवाशांची आर्थिक फसवणूक - कोणत्याही प्रकारच्या तिकिटासाठी प्रवाशांकडून प्रत्येकी दहा रुपये कमिशन घ्यावे, असा नियम आहे. मात्र, प्रवाशांची गरज ओळखून अतिरिक्त पैसे उकळले जातात. कधीकधी तिकिटामागे 100 रुपये घेतले जातात. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने तीन सेंटरवर चार एजंटांवर कारवाई केली आहे. तीनपैकी दोन सेंटरचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला. एकाला आर्थिक दंड करण्यात आला. चार एजंटांना रेल्वे पोलिस कोठडी मिळाली.
प्रवासी म्हणतात..
नियमांचे उल्लंघन - आरक्षण केंद्रातून तिकिटे देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ आहे. तिकीट मिळण्यासाठी किमान दोन तास लागतात. सकाळी काही एजंट केंद्रात येऊन तिकिटे नेतात. त्यांच्याजवळ आरक्षणाचे एकापेक्षा अधिक फॉर्म असतात. रेल्वे नियमांप्रमाणे एका व्यक्तीजवळ केवळ एकच फॉर्म असणे आवश्यक आहे. मात्र त्याचे उल्लंघन केले जाते.’’ सिद्रामप्पा बुर्हाणपुरे, सोलापूर
लाभदायक, नुकसानही - ई-बुकिंगची सुविधा चांगली आहे. मात्र, ज्यांना त्याबाबत सविस्तर माहिती आहे, त्यांच्यासाठीच ती लाभदायक ठरते. काहींना त्याचा फटकाही बसतो. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. ई-बुकिंग करणार्या प्रवाशांना फोटो ओळखपत्र दाखवणे सक्तीचे असते.त्यामुळे नागरिकांचा आरक्षण केंद्रावर तिकीट काढणे पसंत करतात’’ प्राजक्ता सलगर, सोलापूर
नाईलाजास्तव एजंटांकडे - मी महाविद्यालयीन तरुण आहे. कामासाठी नेहमी पुण्याला जावे लागते. जेव्हा जेव्हा मी आरक्षित तिकीट काढण्यासाठी आरक्षण केंद्रावर येतो, त्या त्या वेळी मला वेटिंगच मिळते. त्यामुळे नाईलाजास्तव एजंटांकडे जातो. तेथे गेल्यानंतर आरक्षणाची हमी असते. आरक्षण केंद्रातून कधीच आरक्षित तिकीट मिळालेले नाही.’’ लोहित नाईक, सोलापूर
प्रवासी ई-तिकीटकडे का वळले?
1. सोलापूरमधील रेल्वे आरक्षण केंद्रात टोकन सिस्टीम लागू आहे. त्यामुळे तिकिटासाठी तास ते दोन तास वेळ जातो. यामुळे अनेकजण एजंटांकडे जाऊन ई-तिकीट काढतात.
2. एखाद्या गाडीचे एखाद्या तारखेचे तिकीट उपलब्ध नसेल तर पर्याय देण्यात येतो. अन्य गाड्यांची सविस्तर माहिती दिली जाते.
3. तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकपर्यंत येण्याची आवश्यकता नाही. पर्यायाने वाहतूक खर्च वाचतो.
4. तिकीट काढण्यासाठी रांगेत ताटकळत बसावे लागत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.