आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Transport Disturb After Accident In Satara

मालगाडीचे १८ डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - कोल्हापूरहून पुण्याकडे जाणा-या रेल्वे मालगाडीचे अठरा डबे बुधवारी पहाटे रुळावरून घसरले. फलटण येथील आदर्की गावाजवळ ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात काेणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुणे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. त्यामुळे काही रेल्वेगाड्या इतर मार्गाने वळवाव्या लागल्या. शुक्रवारी पहाटेपर्यंत वाहतूक सुरळीत हाेण्याचा अाशावाद रेल्वेच्या अधिका-यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर येथून निघालेल्या ४२ डब्यांच्या मालगाडीत सांगली येथील कारखान्यांची साखर भरण्यात आली होती. फलटणजवळील आदर्की येथे पहाटे साडेपाचच्या दरम्यान या गाडीचे अठरा डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रुळावरून डबे हटवण्यासाठी मिरज तसेच पुणे येथून यंत्रणा मागवण्यात आली. पंचनामे करण्याचे कामही सुरू झाले.

मध्यरात्रीपर्यंत डबे हटवण्याचे काम पूर्ण हाेईल तसेच पहाटेपर्यंत हा मार्ग रेल्वे वाहतुकीस खुला करता येईल, अशी माहिती सातारा येथील रेल्वे अधिका-यांनी दिली. या अपघातामुळे कोल्हापर - पुणे, मुंबई ही रेल्वेसेवा विस्कळीत झाली. या मार्गावर दररोज २० प्रवासी गाड्यांची वाहतूक हाेत असते. त्या गाड्या अाज रद्द कराव्या लागल्या.