आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेचा सहा ठिकाणचा पाणीपुरवठा केला बंद, महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर- महापालिका करापोटी रेल्वे विभागाकडे सुमारे सात ते आठ कोटी रुपये थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी महापालिकेने रेल्वे विभागाचा पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइन बंद करण्याची मोहीम मागील दोन दिवसांपासून हाती घेतली आहे. १२ ठिकाणची ड्रेनेज लाइन बंद केली, तर एका ठिकाणच्या सहा इंचीसह सहा ठिकाणचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद केला. आतापर्यंत रेल्वेवर केलेली सर्वात मोठी कारवाई आहे.

रेल्वे विभागाने मनपाचा संपूर्ण कर भरण्यास असमर्थता दर्शवली आहे. ३१ मार्च रोजी मनपाच्या साहाय्यक आयुक्त अमिता दगडे-पाटील रेल्वेकडे वसुलीला गेल्या होत्या, पण रक्कम दिली नाही. त्यामुळे महापालिकेकडून रेल्वे विभागावर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवसांत १२ ठिकाणचे ड्रेनेज बंद करण्यात आले, तर गुरुवारी सहा ठिकाणचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.

तीन दिवसांत परिणाम दिसून येईल
महापालिकेनेड्रेनेज लाइन आणि पाणीपुरवठा दोन दिवसापूर्वी बंद केला. या सुविधा बंद केल्याचा परिणाम शनिवारपासून दिसून येईल, असे मनपा ड्रेनेज विभागाचे विजय कांबळे आणि पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

रेल्वेकडून टाळाटाळ
याबाबत रेल्वेची भूमिका समजून घेण्यासाठी रेल्वेचे अधिकारी के. मधुसूदन आणि मदनलाल मीना यांच्याशी गुरुवारी रात्री संपर्क साधला असता, माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.

कारवाई सुरूच राहणार
रेल्वेविभागास अनेक ठिकाणांहून पाणीपुरवठा मनपाकडून करण्यात येत आहे. ३० ते ३२ ठिकाणांहून ड्रेनेज लाइन जोडली आहे. ती तोडण्यात येत आहे. रेल्वेकडून रक्कम आल्यास यापुढे कारवाई सुरूच ठेवणार आहे. अमितादगडे-पाटील, साहाय्यक आयुक्त, मनपा