आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी तडाखा : पावसाने उडाली धूळधाण, अनेक घरांमध्ये पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विडी घरकुल भागातील घरांमध्ये पाणी, तर कुठे साचले तळे... - Divya Marathi
विडी घरकुल भागातील घरांमध्ये पाणी, तर कुठे साचले तळे...
सोलापूर - रणरणत्या उन्हाने हैराण झालेल्या सोलापूरकरांची मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने एकच धूळधाण उडाली. आधी सोसायट्याचा वारा सुटला आणि अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यानंतर विजेच्या कडकडाटांसह पाऊस बरसला. काही भागांत गारा पडल्या. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. वीज खंडित झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. शहरासह दक्षिण तालुक्यातील मंद्रूप आणि परिसरात हा पाऊस होता. मात्र, जिल्ह्यात इतरत्र तो नव्हता.

हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुलमध्ये सागर चौक, महालक्ष्मी चौक पूर्णपणे जलमय झाला. घराघरांत पाणी शिरले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमाराला पाऊस थोडासा थांबला. पण रात्री उशिरापर्यंत पाणी काढण्याचे काम नागरिक करत होते. तेथील नगरसेवक फिरून पाहणी करत होते. त्यांचे सहकारी कार्यकर्ते मदतीला आले होते.

तापमानाच्या चढत्या पार्‍याने मे महिन्याची सुरुवात झाली. मे रोजी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची (४३.४ सेल्सिअस) नोंद झाली. त्याच्या दुसर्‍या दिवसापासून मात्र त्यात अंशत: घट होण्यास सुरुवात झाली. मंगळवारी दुपारी ऊन होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला अचानक वादळी वार्‍याला सुरुवात झाली. प्रचंड धूळ उडत असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. जोरदार सरीवर सरी कोसळल्याने नागरिकांची धांदल उडाली. त्यानंतर काही भागातील वीज गेली. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तापमानाचा पारा चढता राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मंगळवारी पाऊस येण्याची शक्यता नव्हती. तापमान ४२ अंशावर स्थिरावले होते. सायंकाळी मात्र अचानक वादळी वार्‍याला सुरुवात झाली. दाटून आलेले ढग सोसाट्याच्या वार्‍याने पुढे सरकतील, असे वाटत असताना जोरदार सरी कोसळण्याला सुरुवात झाली. त्यानंतर वारा वाहेल त्या दिशेने झोडपून काढले.

ठळक घडामोडी
१.होटगी रस्ता : आसरा चौक, महावीर चौक, हरिभाई देवकरण प्रशाला येथील रस्त्यांवर पाणी साचले होते.
२. सम्राट चौक : पोलिस चौकी, नीलकंठ बँक, कस्तुरबा मंडई, बाळीवेस येथील रस्ते झाले जलमय
३. जोडभावी पेठ : मंगळवार बाजार, गणेश पेठ, सोमवार पेठ, साखर पेठ आदी भागांत पाणीच पाणी
४. जुळे सोलापूर : रत्नमंजिरी नगरात एका घरातील स्लॅबच्या खालचा भाग पडल्याने मुलाला दुखापत
५. शेळगी : नटराज सोसायटी, मित्र नगर, महताब नगर आदी भागांमध्ये कमरेइतके पाणी साचले होते.

जाणवला गारवा, पण...
गेल्याकाही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने सोलापूरकर हैराण झाले होते. प्रचंड उकाड्याने नागरिक गच्चीवर झोपले होते. त्यामुळे चोरीच्या घटना घडल्या. मंगळवारी झालेल्या पावसाने मात्र गारवा जाणवला. वातावरण मोकळे झाले. पण झोडपून गेलेल्या पावसाने झोपडीधारकांचे नुकसान केले. घरात शिरलेले पाणी रात्री उशिरापर्यंत काढण्याचे काम सुरू होते. वार्‍यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेले.
नागरिक लोकप्रतिनिधी म्हणतात...
पावसाळा पूर्व नालेसफाई काम झाले नाही. अद्याप त्याला अवकाश असल्याचे वाटले. परंतु अचानकच्या पावसाने मात्र नाले भरले. परिणामी घराघरांत पाणी शिरले. पालिकेने आताच धडा घेऊन नालेसफाई हाती घ्यावे.” विठ्ठलकोटा, नगरसेवक

शेळगी परिसरातील मित्र नगरात पाणी शिरल्याने कमरेइतके पाणी होते. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बहुतांश घरांमध्ये स्वयंपाक करता आला नाही. अवकाळी पावसाचा त्रास झाला.” सिद्धाराम उमराणी, रहिवासी