आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी दोन दिवस संततधार राहणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कमी दाबाचे पट्टा दक्षिणेला सरकला असून, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे. आणखी दोन-तीन दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाच्या उपमहासंचालिका मेधा खोले यांनी म्हटले आहे. शहर आणि जिल्ह्यात गुरुवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. दाटून आलेले ढग आणि पावसाची रिपरिप यामुळे दिवसभर सूर्यनारायणाचे दर्शन झालेच नाही. 24 तासांत 63.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गुरुवारी 15.2 तर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत शहरात तब्बल 48.2 मिलिमीटर पाऊस बरसला. जिल्ह्यात एकूण 125.69 पर्जन्य नोंदले गेले. पावसाने जिल्ह्यात सवर्दूर हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि गारठा असे वातावरण होते. नागरिकांना रेनकोट घालून अथवा छत्री घेऊनच बाहेर पडावे लागले. पावसाच्या संततधारेमुळे रस्त्यावरील फेरीवाले, भाजी विक्रेते यांचे हाल झाले. बाजारपेठांमध्ये नेहमीसारखी गिर्‍हाईकांची गर्दी नव्हती, त्यामुळे शुकशुकाट होता. व्यापार्‍यांनी बहुतांश दुकाने बंदच ठेवल्याचे दिसून आले.

रस्त्यांवर चिखल
गुरुवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने रात्री काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र शु्क्रवारी पहाटेपासून पुन्हा संततधार सुरू झाल्याने शहरातील रस्ते जलमय झाले. बहुतांश रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचून दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. नगरोत्थानच्या कामासाठी खोदलेल्या खड्डय़ांमुळे रस्ते चिखलाने माखले होते. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचार्‍यांची तारांबळ उडाली.

उडाली तारांबळ
शेळगीत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूच्या घरांमध्ये घुसले पाणी.
शेळगीत मुलींच्या वसतिगृहसह सुमारे 100 घरांत तीन ते चार फूट पाणी.
बाळीवेस, पत्रा तालीम, सोन्या मारुती येथे इमारतींच्या भिंती कोसळल्या.
आयुक्त गुडेवार यांनी घटनास्थळांना भेटी देऊन यंत्रणेस कामास लावले.