आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नळापेक्षा छतावरचे पाणी शुद्ध’; एकदिवसीय कार्यशाळेतील सूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - छतावर पडणारे पावसाचे पाणी हे शुद्ध असते. हे शुद्ध पाणी साठवण्याऐवजी सर्वजण नळातून येणारे ‘अशुद्ध’ पाणी मिळवण्यासाठीच खटाटोप करतात, अशी खंत जलतज्ज्ञ विद्याधर वालावलकर (ठाणे) यांनी व्यक्त केली. महापालिका आणि कै. वसंतराव भागवत स्मृती संस्थेने जलपुनर्भरण विषयावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात ‘प्रदूषणावर मात : एक सामाजिक चळवळ’ या विषयावर ते बोलत होते.


रसायन मिर्शित पाण्यावर कोणताही उपाय नाही. जलप्रदूषण रोखण्यासाठी कचर्‍यांची विल्हेवाट महत्त्वाची बाब आहे. कचरा गोळा करणार्‍यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, असेही ते म्हणाले. नगरसेवक, महापालिका पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी आणि मान्यवर नागरिकांसाठी जलपुनर्भरण विषयावर मंगळवारी महापालिकेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली.


उद्घाटन महापौर अलका राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभागृह नेते महेश कोठे, पालिका आयुक्त अजय सावरीकर, शिक्षण मंडळ सभापती प्रा. व्यंकटेश कटके, स्मृती संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ बेंद्रे, उपाध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेवक प्रवीण डोंगरे, दिलीप कोल्हे, गीता मामड्याल, काशिनाथ भतगुणकी, चंदूभाई देढिया, रेळेकर यांनी प्रश्न विचारले. महापौर राठोड यांनी प्रश्नांना उत्तरे देत महापालिकेची भूमिका मांडली.


लोकसहभाग महत्त्वाचा
श्री. वालावलकर म्हणाले, पाण्यात रसायन मिश्रीत करणे पाप आहे. रसायन मिश्रीत पाणी पावसामुळे पुन्हा पाण्यात मिश्रीत होते. त्यामुळे पाणी अशुद्ध होते. शरीरात रसायन मिश्रीत पाणी गेल्यास त्यावर उपाय करता येत नाही. छतावर पडणारे पावसाचे पाणी शुद्ध असते ते सोडून नळातील अशुद्ध पाणी आपण घेतो. पावसाचे पाण्याचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. कचरा पाण्यात मिश्रीत होऊ देऊ नये. सतत ‘मूव्हेबल’ ठेवल्यास 20 टक्के कचरा कमी होतो. जलसाक्षरतेसाठी जनजागृती आणि जलपुनर्भरणसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.

महापालिकेत नगरसेवक आणि सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधींसाठी घेतलेल्या जलपुनर्भरण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विद्याधर वालावलकर.

शहरात तयार करा 200 तळे
जलतज्ज्ञ अरुण देशपांडे यांनी नैसर्गिक जलस्त्रोत या विषयावर मार्गदर्शन केले. सोलापुरात पडणारे पाणी साठवण्यासाठी प्रत्येक प्रभागात बचत गटाच्या माध्यमातून किंवा नगरसेवकांच्या पुढाकारातून वॉटर बँक तयार करणे आवश्यक आहे. शहरात 200 तळे तयार करता येईल, अशी परिस्थिती आहे. पाण्याचे ऑडिट केले पाहिजे. उजनीतून पाइपलाइनने पाणी आणणे चुकीचे आणि असुरक्षित आहे, असे मत देशपांडे यांनी व्यक्त केले.

महापालिकेकडून पाहणी व्हावी
विवेकानंद केंद्राकडून गेल्या दहा वर्षांपासून जलपुनर्भरण क्षेत्रात काम करण्यात येत आहे. विवेकानंद केंद्राचे प्रशांत स्वामी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. जमिनीतून पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. मात्र जलसंतुलन राखण्यासाठी जलपुनर्भरण संच बसवणे गरजेचे आहे. वापर परवाना देताना जलपुनर्भरण संच बसवले किंवा नाही हे महापालिकेने पाहावे, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

नगरसेवकांची उदासीनता
जलपुनर्भरण या विषयावर नगरसेवकांसाठी कार्यशाळा आयोजीत केली असताना त्याकडे नगरसेवकांनीच पाठ फिरवली. नगरसेवकापेक्षा नगरसेविकांची संख्या जास्त होती. महापालिका सभागृहात आवाज उठवणारे सुरेश पाटील, जगदीश पाटील, मनोहर सपाटे, आनंद चंदनशिवे आदी नगरसेवकांनी दांडी मारली. नगरसेवकांची ही उदासीनता चिंताजनक म्हटली पाहिजे.

‘दिव्य मराठी’मुळे विषयाला वाचा
जलपुनर्भरण ही काळाची गरज आहे. शहरात पडणारे सुमारे 25 टीएमसी पाणी वाहून जात असल्याचे ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केल्यामुळे जलपुनर्भरण विषयाला चालना मिळाली. त्यामुळे या विषयावर महापालिकेने कार्यशाळा घेतली.