आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raj Thackeray Rally In Solapur On Friday 22nd Feb.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सभा नाट्य : राजच्या सभेसाठी वृक्षतोड; मैदानासाठी कार्यकर्त्यांची धावाधाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावरील झाडांची कत्तल करण्यात आली. त्यासाठी जेसीबीसारखे यंत्र वापरण्यात आले. झाडांचा धोका असल्याने तोडण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. या मैदानावर अनेक मेळावे, संमेलने व राजकीय पक्षांच्या सभा झाल्या. मात्र, झाडे तोडण्याचा क्रूर प्रकार पहिल्यांदाच दिसून आला.

ठाकरे यांची सभा येत्या शुक्रवारी सायंकाळी पाचला होत आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. तयारीची कुर्‍हाड मैदानाच्या कडेला असलेल्या झाडांवर कोसळली. प्रशालेच्या प्रवेशदाराच्या डाव्या बाजूस असणारी चार व उजव्या बाजूचे एक अशी पाच झाडे बुंध्यापासून तोडण्यात आली आहेत. त्यात एका मोठय़ा कडूनिंबाच्या झाडाचा समावेश आहे. तोडकामानंतर ओंडक्यांची त्वरित विल्हेवाट लावण्यात आली. विशेष म्हणजे या बाबतची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.

नियम काय सांगतो...
वन कायद्यानुसार झाड तोडण्यासाठी परवानगी बंधनकारक असते. अर्ज आल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी पाहाणी करून कारणाची खातरजमा करतात. पंचनामा करतात. त्यानंतरच झाड तोडण्याची परवानगी देतात. एकाच्या बदल्यात दोन झाडं लावणे सक्तीचे असते. बाभूळ वगळता सर्व जातींची झाडे तोडण्यासाठी परवाना आवश्यक आहे. कडूनिंब, साग, चंदनाचे झाड तोडण्यासाठी तहसीलदारांची परवानी आवश्यक असते. तोडलेल्या झाडांचे लाकूड वाहून नेण्यासाठीही वनविभागाचा परवाना बंधनकारक आहे.

परवानगी मागितली नाही
नॉर्थकोट प्रशालेतील धोकादायक झाडं तोडण्याबाबत उद्यान विभागाकडून कुणी परवानगी घेतली नाही अन् आम्ही कुणालाही दिली नाही. शनिवारी मी कार्यालयात होतो. माझ्याकडे कुणाचेही पत्र किंवा अर्ज आला नाही.’’
विश्वास शिंदे, साहाय्यक उद्यान विभागप्रमुख, महापालिका

फांद्या छाटण्यास सांगितले
सभेच्या मैदानभोवतीच्या झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडण्यास आम्ही सांगितले होते. त्या फांद्यामुळे काही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून आम्ही ती परवानगी दिली. पण, झाडं तोडण्यास सांगितले नव्हते.’’
एस. डी. शिंदे, प्राचार्य, नार्थकोट प्रशाला

चौकशी करण्यात येईल
नॉर्थकोट प्रशालेतील झाडे तोडण्याची व लाकूड वाहतुकीसाठी परवानगी मागितलेली नाही. शहरातील झाडं तोडण्याची परवानगी देण्याची जबाबदारी आमची नाही. पण, झाड तोडल्यानंतर त्याच्या लाकूड वाहतुकीसाठी आमची परवानगी आवश्यक असून त्याबाबतची चौकशी करण्यात येईल.’’
दादासाहेब हजारे, वनपरिक्षेत्र अधिकारी