Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» Raj Thackeray Slams State Government Ministers

पवार काका-पुतण्यांच्या राजकारणामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ- राज ठाकरे

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 23, 2013, 11:18 AM IST

  • पवार काका-पुतण्यांच्या राजकारणामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ- राज ठाकरे

सोलापूर - आज महाराष्‍ट्रात भयानक दुष्काळ पडला आहे, तो येणार याची माहिती असूनही महाराष्‍ट्रातील मंत्र्यांनी त्यावर मात करण्यासाठी काहीच केले नाही. तिकडे गुजरातेत शेकडो किलोमीटरचा कॅनॉल टाकून नर्मदेचे पाणी कच्छ भागात आणले. इकडे सोलापूरच्या हक्काचे उजनीचे पाणी बारामतीला नेले जात आहे. काका-पुतण्यांच्या या राजकारणामुळेच दुष्काळ ओढवला आहे. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे दोन ज्येष्ठ मंत्री केंद्रात आहेत, तरीही महाराष्ट्राची उपेक्षा होते. वर्षानुवर्षे ते सत्तेत आहेत. त्यांना याचे काहीही वाटत नाही. महाराष्‍ट्राचा या नेत्यांनी मजाक करून ठेवला आहे. हे चित्र बदलण्यासाठी लोकांनी जागृत झाले पाहिजे,असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केले.

सोलापूरमधील सभेत राज ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर टीका करतानाच त्यांच्या आवाजाची नक्कलही करून दाखवली. तसेच शिंदे यांची ‘राजकारणातील शशी कपूर’ अशी तुलना करत त्यांनी दलितांसाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित केला.

बेअक्कल लोकांचीच नक्कल करतो
राष्‍ट्रवादीत काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्याचा आणि पुन्हा मंत्री होण्याच्या मुद्द्याने राज यांचे भाषण सुरू झाले. ‘आपल्या मागे खूप आमदार आहेत असे समजून अजित पवारांनी राजीनामा दिला, पण प्रत्यक्षात त्यांच्या पाठीशी कोणीही नव्हते. काकाने डोळे वटारले तेव्हा म्हणाले, ‘काका मला माफ करा’. दोन महिने बिनखात्याचे मंत्री बनून राहिले. त्यांनी काकाची माफी कशी मागितली, बंड कसे केले हे त्यांनाच ठाऊक. घरच्यांच्या जीवावर जगण्याचे हे वय नाही. 52 वय झाले तरी काकाच्या जीवावर जगतो आहे. काकाने हात काढला तर कोणीही विचारणार नाही, अशी त्यांची स्थिती आहे. अजित पवारांनी नकलाबाबत केलेल्या वक्तव्यालाही उत्तर देताना राज म्हणाले, अक्कल नसणा-यांचीच आम्ही नक्कल करतो.

दुष्काळ चोरपावलाने येतो
शरद पवारांना उद्देशून बोलताना राज म्हणाले, ‘‘पवार साहेब, दुष्काळ पडला कसा? आला कसा? हे तुम्हाला माहीत का झाले नाही?, सर्व महत्त्वाची खाती तुमच्या पुतण्याकडेच आहेत. 70 ते 80 हजार कोटी रुपयांचा पाण्याच्या योजनांचा निधी कुठे गेला?, भूकंप, पूर आवाज करत येतात, पण दुष्काळ चोरपावलाने येतो, हळूहळू येतो हे कळते, मग नियोजन का झाले नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

राज्यात बदल घडवा
महाराष्‍ट्रातले मंत्री म्हणजे नोकर आहेत, ते जर या पदावरून उतरले तर त्यांना दुसरे, तिसरे काहीच जमत नाही. पैसे फेकले की मते मिळतात, असा समज त्यांनी करून घेतला आहे. तो समज जोवर दूर केला जात नाही तोवर महाराष्‍ट्राच्या वाट्याला हेच भोग येणार आहेत. आजवर लोकांसमोर पर्याय नव्हता. आता पर्याय म्हणून मी पुढे आलो आहे. मी महाराष्‍ट्राचे एक स्वप्न पाहिले आहे. ते साकारण्यासाठी आपण मला साथ द्या. बदल घडवायचा असेल तर आमूलाग्र घडवा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

Next Article

Recommended