आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajarshi Tapadiya Safe Return From Uttrakhand Flood

राजश्री तापडिया यांनी मृत्यूला उत्तराखंडमध्ये जवळून पाहिले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रलय आला आणि होत्याचे नव्हते झाले. आम्ही टेकडीवरील लॉजमध्ये होतो, त्यामुळे बचावलो. ढगफुटीच्या प्रकोपाची भीषणता डोळ्यासमोरून जात नाही. मृत्यूला पहिल्यांदाच इतक्या जवळून आम्ही पाहिले, असा थरारक अनुभव राजश्री राजेंद्रकुमार तापडिया (सोलापूर) यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला. सुरतमधील माहेरच्या मंडळीसोबत चारधाम यात्रेसाठी गेले होते. 17 जून रोजी आम्ही उत्तर काशी येथे पोहोचलो. जान्हवी लॉजवर आम्ही मुक्कामासाठी थांबलो होतो. सलग तीन दिवस मुसळधार पाऊस होता. 17 जून रोजी सायंकाळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. खालच्या बाजूला मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती होती. पाण्याच्या प्रवाहात पूर्ण वस्ती वाहून गेली. प्रसिद्ध असलेले थ्री स्टार हॉटेल आकाशगंगा पूर्णपणे पाण्यात वाहून गेले. मोठ-मोठी वाहने काडीपेटी प्रमाणे वाहून जात होती. हे दृश्य म्हणजे मृत्यूला जवळून पाहण्याचा तो थरकाप उडवणारा प्रसंग होता. रात्रभर एक मिनीट डोळा लागला नाही. जप करण्यातच रात्र गेली. तेथे आमचे पाच दिवस गेले.

लॉजमध्ये खाण्यापिण्याची सोय होती. बचाव कार्यासाठी आलेले फौजी जेवणाच्या पिशव्या देत होते. आपल्या जीवाची पर्वा न करता ते इतरांचे प्राण वाचवण्यात मग्न होते. सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी बर्‍याचवेळा दूरध्वनीवरून संपर्क साधून आमची विचारपूस केली. मृत्यूच्या तांडवामधून बाहेर पडेल, याची काहीच गॅरंटी नव्हती. ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा, यामुळेच मी सोलापूरला सुखरूप पोहोचले, अशा शब्दात त्यांनी मन मोकळे केले.