आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raju Shetty News In Marathi, Swabhimani Shetkari Sanghatna, Sharad Pawar

‘शाई’च्या वक्तव्यातून वर्षानुवर्षे केलेले राजकारण बाहेर आले - राजू शेट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मतदान केल्यानंतर बोटाची शाई पुसून टाका, या वक्तव्यातून शरद पवारांनी वर्षानुवर्षे केलेले राजकारण बाहेर आले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केली.
महायुतीच्या प्रचारानिमित्त शेट्टी सोलापुरात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, ‘माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न, चारा छावण्यांमध्ये झालेला घोटाळा, अपूर्ण सिंचन प्रकल्प, साखर सम्राटांची गुंडगिरी असे प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही प्रचार करणार आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारने लोकांना थापा मारण्याचे काम केले. निवडणुका आल्या की मराठा आरक्षणाचा विषय पुढे केला जातो. आताही घाईघाईने नारायण राणे समिती नेमून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. धनगर, कोळी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही असाच लटकत ठेवण्यात आला आहे.


आमची दोन साखर सम्राटांविरुद्ध लढाई
शेट्टी म्हणाले, ‘हातकणंगले मतदारसंघात मी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष कल्लपाण्णा आवाडे यांच्याविरोधात तर माढय़ामध्ये सदाभाऊ खोत राज्य साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते यांच्याविरोधात लढत आहेत. ही साखर सम्राटांविरोधातील लढाई आहे. साखर सम्राटांना कारखानदारांकडून मदत केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून मदत दिली जात आहे.’


गळ्यात शिट्टी
एका झाडाखाली थांबून राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवडणूक चिन्ह शिट्टी आहे. त्यामुळे शेट्टी यांनीही गळ्यात शिट्टी घातली होती. दिवसभर शिट्टी त्यांच्या गळ्यातच होती.


राष्ट्रवादी, काँग्रेसमुळे जिल्हा बँक अडचणीत
शेट्टी यांनी पालकमंत्री दिलीप सोपल यांच्यावरही टीका केली. सोपल हे जिल्हा बँकेचे कारभारी आहेत. त्यांच्या काळात बँकेचा एनपीए वाढला. सर्वसामान्य शेतकर्‍याला बँकेकडून मदत मिळत नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 7 नेत्यांमुळे जिल्हा बँक अडचणीत आल्याचा आरोपही त्यांनी केला.