आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पेशकार’ व ‘अर्पित’ची गुरूंना श्रद्धांजली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रामाचार्य बागेवाडीकर यांना अर्पित नृत्यालय व पेशकार फ्यूजन संगीत संस्थेच्या वतीने नृत्य, संगीत व तालवादनाने श्रद्धांजली वाहण्यात आली. शनिवारी सायंकाळी अँम्फी थिएटरमध्ये स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली संगीत सभेची सुरुवात डॉ. शांता किलरेस्कर, शहनाई वादक टी. एन. गिरमल्लप्पा व नृत्य प्रशिक्षक मनीषा जोशी यांच्या हस्ते झाली.

प्रथम सत्रात गिरमल्लप्पा यांनी शहनाईची एक धून वाजवून हंसध्वनी या रागात बडा ख्याल व छोटा ख्याल वाजवून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर मिर्श रागातील एक धून वाजवली. या वेळी त्यांनी रसिकांना मोहून टाकले. त्यांना तबल्याची साथ बसंतराय हुगार यांनी केली. या दोहोंचा सत्कार प्रसिद्ध सुंद्रीवादक भीमण्णा व गुरुनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

द्वितीय सत्रात मनीषा जोशी व शिष्य परिवाराने पारंपरिक बनारस शैलीचे नृत्य सादर केले. लयबद्ध पदन्यास व भाव प्रकट करणार्‍या नृत्याने त्यांनी रसिकांना तृप्त केले. या वेळी त्यांनी उठाण, पेशकार, ततकार, तोडे, गतपरन, परमेलू कायदा व तराना याचे सादरीकरण केले. या वेळी त्यांना शिष्य सिद्धी जोशी, वृषाली पवार, प्रज्ञा जामगावकर, र्शुती देशपांडे यांनी साथ केली. या नृत्याच्या सादरीकरणास रमा सूर्यवंशी यांची गायनाची, सुधांशू कुलकर्णी, ओंकार सूर्यवंशी व संजय बागेवाडीकर यांची तबल्याची, तर नागनाथ नागेशी, उमा कुलकर्णी यांची संवादिनीची उत्तम साथ लाभली.

पंडित रविशंकर यांना ‘फ्युजन’ची आदरांजली

पंडित रविशंकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पेशकार संस्थेच्या युवा कलावंतांनी ‘फ्यूजन’ या विविध ताल वाद्यांच्या वादनाचा कार्यक्रम सादर केला. या वेळी नागेश भोसेकर व ओंकार सूर्यवंशी यांनी पंडितजींनी निर्मित केलेल्या परमेश्वरी राग रूद्र ताल व तीन तालात शब्दबद्ध केलेला तराना सादर केला. पुढे बोलांची पढत, तबला, संबळ, आफ्रिकन ड्रम, दिमडी, अँक्टोपॅड यांचे दिलखुलास वादन व जोडीला अर्पित नृत्यालयाच्या कथक नृत्याचा विविधाविष्कार याचे सादरीकरण झाले.