आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना आयएएस, आयपीएस बनवा; शिक्षणाने समाज पुढे जाईल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कुराण ग्रंथ आहे. त्याचे प्रत्येकाने पठण केलेच पाहिजे. सहिष्णुता आणि एकात्मता ही मानवतेची शिकवण या ग्रंथात आहे. याकडे दुर्लक्ष केलेली मंडळी दहशतवादाकडे वळली. त्यांची कृत्ये इस्लामविरोधी आहेत. प्रेषितांनी शांतीचा संदेश दिला. एकमेकांवर प्रेम करा, गरिबांना दान करा, प्रामाणिकपणे काम करा असेच त्यांचे सांगणे असते. सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आधी शिक्षित व्हा, मुला-मुलींना शिकवा. इतरांना शिक्षण घेण्यासाठी उद्युक्त करा. शिक्षणानेच समाज पुढे जाईल, असे मौलाना ताहेर बेग यांनी शुक्रवारी सांगितले. रंगभवन येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा केल्यानंतर त्यांनी प्रेषितांचा संदेश दिला.

मुले ही अल्लाहची देण:
मुले ही अल्लाहची देण आहे. त्यांना उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे. केवळ डॉक्टर, इंजिनिअरच नव्हे तर आयएएस, आयपीएस अधिकारी होतील यासाठी लहानपणापासूनच त्यांना तशी तालीम दिली पाहिजे. एक वेळच्या जेवणाचा खर्च कमी करा पण मुलांच्या शिक्षणावर खर्च करा, असा उपदेश शहर काझी अमजद अली काझी यांनी दिला. होटगी रोड येथे रमजान ईदनिमित्त शहर काझी यांच्या उपस्थितीत नमाजपठण झाले. नमाज पठणानंतर त्यांनी उपदेश दिला. हजारो मुस्लिम बांधवांनी नमाजपठण केले.

सकाळी काही ठिकाणी साडेनऊ तर काही ठिकाणी दहा वाजता नमाज अदा झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा तर दिल्या. अन्य धार्मियांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. घराघरात शिरकुम्र्याचा बेत होता. त्यात हिंदू बांधवांनाही सहभागी करून घेणत आले. दुसरीकडे सुटी असल्याने शाहरूखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेसची’ धूम दिसून आली. हा चित्रपट प्रदर्शित झालेल्या सर्वच थिएटरवर गर्दी होती. भागवत चित्रपटगृह संकुलात फटाके फोडून जल्लोषात स्वागत झाले. रमजान सुटीला जोडून दुसरा शनिवार व रविवार अशा आणखी दोन सुट्या आल्याने ती पर्वणीच ठरली.

काळ्या फितीला मिळाला नाही प्रतिसाद
पोलिस मुख्यालयातील मशीद सामूहिक नमाजपठणासाठी खुली करावी या मागणीसाठी काळ्या फिती लावण्याचे आवाहन काही संघटनांनी केले होते. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. काहींनी काळ्या फिती लावल्या पण ती संख्या अत्यल्प होती.

वेगात गाडी चालविणे, फॅशनचे कपडे परिधान करणे परवडणारे नसल्याचा संदेश शहर काझींनी तरुणांना दिला.
नमाज पठणानंतर शहर काझींचे प्रवचन व नंतर खैरात वाटप केली.

अन् शाहरूखची एक्स्प्रेस
ईदनिमित्त महापौर अलका राठोड, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, साहाय्यक आयुक्त पंकज जावळे आदींनी उपमहापौर हारून सय्यद, स्थायी समिती सभापती ईब्राहीम कुरेशी, महिला बालकल्याण सभापती फिरदोस पटेल, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक पीरअहमद शेख, खैरूनबी शेख, रफिक हत्तुरे, बाबा मिस्त्री, परवीन इनामदार, पैगंबर शेख, रियाज हुंडेकरी, नगरसचिव ए. ए.पठाण, अभियंता नाईकवाडी यांच्या घरी जावून शुभेच्छा दिल्या. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच मुस्लिम नगरसेवक, अधिकार्‍यांना अशा शुभेच्छा महपालिका प्रमुखांकडून मिळाल्या आहेत.