आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकी जपण्यासाठी अल्लाहकडे दुआ; अमजदअली काझी यांनी समाजबांधवांना ईदचा संदेश दिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-संकुचितवाद, जातीयवाद याबाबत दिशाभूल करणार्‍यांपासून मुस्लिम युवकांना सावध राहण्याचा संदेश देत माणुसकी जपण्याचा सल्ला शहर काझी सय्यद अमजदअली काझी यांनी मंगळवारी दिला. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांशी ते संवाद साधत होते. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सनदी अधिकारी बनण्याची आकांक्षा युवकांनी ठेवावी, असे ते म्हणाले.होटगी रस्त्यावरील आलमगीर ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची सामुदायिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर शहर काझींनी आपल्या प्रवचनात ईदचा संदेश दिला. सकाळी नऊ वाजल्यापासूनच ईदगाह मैदानावर गर्दी वाढत होती. मैदानावर थोडाफार चिखल होता. साडेनऊ वाजता सामुदायिक नमाज पठणास सुरुवात झाली. नमाजनंतर मुस्लिम समाजबांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आबालवृद्धांच्या चेहर्‍यावर ईदचा उत्साह दिसून येत होता. शहरातील सर्वच ईदगाह मैदानावर असेच वातावरण होते.
ईदचा संदेश देताना शहर काझी म्हणाले, की समाजाला दिशाभूल करण्याचे काम मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. युवक आणि अस्वस्थ करणार्‍या चालू घडामोडी हा त्यांचा भाषणाचा केंद्रबिंदू होता. उच्च शिक्षण घ्या व कठोर पर्शिम करा. महाकवी डॉ. महंमद इक्बाल यांच्या शिकवा-जबाबे- शिकवा या दीर्घकाव्यातील अनेक प्रेरक शेरांची पेरणी त्यांच्या भाषणात होती. देशासह जगभर अनेक ठिकाणी सुरू असलेल्या हिंसेच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. पॅलेस्टाइन व उत्तर प्रदेशातील हिंसक घटनांत मुले, महिला, नागरिक यांना झळ पोहोचल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
शहर काझींच्या हृदयस्पर्शी भाषणानंतर अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी, मांगल्यासाठी दुआ मागितला. समाजातील भीषण दारिद्रय़ दूर करण्याची याचना करताना ते गहिवरले. लोकांचे दु:ख दूर करण्याची विनंती देवाकडे करताना त्यांचा कंठ दाटून आला. काही क्षण त्यांना शब्द फुटले नाहीत. कमालीची शांतता पसरली. अनेकांना गहिवरल्यामुळे डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या.
ठळक मुद्दे..
सकाळी नऊपासूनच होटगी रस्त्यावर गर्दी.
आसरा चौक ते महावीर चौक या मार्गावर वाहतूक बंद
मैदान पूर्ण भरल्यामुळे औद्योगिक पोलिस चौकी, महावीर चौक , विमा हॉस्पिटलच्या बाजूच्या रस्त्यावरही नमाज
पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते गुलाब फूल देऊन मुस्लिम बांधवांचे स्वागत
सकाळी आठ ते सव्वानऊपर्यंत पावसाचा हलकासा शिडकावा
साडेनऊ ते अकरापर्यंत नमाज,
एकमेकांना शुभेच्छा देत ईद उत्साहात, जकात देण्यासाठी गर्दी