आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदगाह मैदानांवर आज होणार ईदची नमाज;मनपाची तयारी पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रमजान ईदची नमाज सामूहिकरीत्या ईदगाह मैदानावर अदा करण्याची परंपरा आहे. शहरातील प्रमुख ईदगाह मैदानावर मागील आठ दिवसांपासून मुरुम टाकून रोलर फिरविणे, स्वच्छता राखण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने शहरातील प्रमुख ईदगाह मैदानावर चिखल झाला आहे.
ईदची नमाज ही ईदगाहमध्ये अदा करण्याच्या सूचना इस्लाम धर्मात देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोलापूर शहरात प्रमुख अशा पाच ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित राहून सामूहिकरीत्या ईदची नमाज अदा करतात. या शिवाय शहरातील सुमारे चारशे मस्जिद आणि मदरशातही ईदची नमाज अदा होते. ईदनिमित्त होटगी रस्ता, पानगल हायस्कूल मैदान, जुनी मिल कंपाऊंड, आसार मैदान, रंगभवन ईदगाह मैदानावर उद्या(मंगळवारी) होणार्‍या नमाजाची तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत वाहतुकीचा मार्ग बदलण्यात येतो. रमजान ईद 29 जुलै रोजी साजरी करण्याची घोषणा सोमवारी चंद्रदर्शन झाल्याने केली आहे. सोलापुरातही मंगळवारी ईद साजरी केली जाणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता शाही अलमगीर इद्गाह (पानगल हायस्कूल) व नवीन शाही अलमगीर इदगाह (होटगी रोड) येथे नमाज अदा केली जाणार आहे. शकील मौलवी (शहर काझी)
सोशल मीडियाचा वाढता गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. कुणीही अफवांना बळी पडू नका. मोबाइल व इंटरनेटवर येणार्‍या मेसेजकडे (चुकीचे येणारे) दुर्लक्ष करा. शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस-प्रशासनास मदत करा. राज्य राखीव दल, होमगार्ड जवानांसह एक हजार पोलिसांचा ताफा तैनात केला आहे. ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा. प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त