आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त चंदन तीन कोटी ३६ लाखांचे, मुख्य तस्कराचे पलायन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - टाकळी येथील चंदन तस्करी कारखान्यावर गुरुवारी दुपारी टाकलेल्या छाप्याची कारवाई शुक्रवारी दुपारी संपली. ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईत तीन कोटी ३६ लाखांच्या चंदनासह ट्रक, कार दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी २६ जणांविरुद्ध मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कारखाना कार्यस्थळाचा शेतमालक तथा टाकळीच्या उपसरपंचासह चंदन पुरवणाऱ्या २३ जणांना अटक केली. कारखान्याच्या मालकासह तिघे मात्र पळून गेले. चंदन तस्करीत आंतरराज्य टोळी असल्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

टाकळी येथून कर्नाटक आंध्र प्रदेशात छुप्या पद्धतीने चंदन तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई झाली. वन विभागाचे या प्रकाराकडे झालेले साफ दुर्लक्ष समोर आले. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक उपाध्याय यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. सोलापूर - विजापूर महामार्गावरील हा चंदन कारखाना वन विभागाने सील केला असतानाही चंदनाची तस्करी सुरूच होती. गुरुवारीच आंध्र प्रदेश कर्नाटकातील पोलिसांना या कारवाईची माहिती दिल्याने तेथील संबंधित अड्ड्यांवर छापे सुरू आहेत. चंदन तस्करीचा सुगावा अन् चोरटे हाती सहाय्यक पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांनी वागदरी (ता. अक्कलकोट) शिवारातून झाड तोडून चंदन विक्रीस नेताना गंगा दत्ता पात्रे देवेंद्र राजेंद्र बनसोडे यांना पकडले होते. ते टाकळी येथे चंदन विक्रीसाठी नेत असल्याचे उघड झाले. त्यानुसार उपाध्याय, सोनकांबळे यांच्या पथकाने टाकळीच्या चंदन कारखान्यावर गुरुवारी (दि. २५) दुपारी सापळा लावला. दोघांनी चंदनाची विक्री करून पावती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारखान्याचा ताबा घेऊन तपासणी सुरू केली. चंदन विक्रीसाठी कारखान्यात येणारे एकेकजण अलगद जाळ्यात सापडत गेले. पोलिस साध्या वेशात असल्याने कोणालाच थांगपत्ता लागला नाही. चंदन विक्रीस आणलेल्या २१ जणांना दहा मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

कारखानामालक पसार, कागदपत्रे हाती :कारखान्याला गुरुसिध्दप्पा बिराजदार यांनी शेतजागा दिली. बशीर महमद कुची कारखान्याचा मालक आहे. पी. एच. नवाज हा चंदनाची खरेदी-विक्री पाहायचा. सोलापूरसह उस्मानाबाद, अहमदनगर, लातूर, कर्नाटकातील गुलबर्गा विजापूर भागातून येथे चंदन विक्रीसाठी येते. नंतर ते परराज्यात पाठविले जायचे. मालक बशीर याचे वाहन चालवण्याचे विविध राज्यातील परवाने, एटीएम कार्ड, बँक कागदपत्रे जप्त केलीत. त्याच्यासह तिघे कारवाईपूर्वीच पळून गेले.

वनविभागाचे दुर्लक्ष की मूक संमती : वनविभागाने१७ मार्च २००५ रोजी अडीच हजार किलो चंदन जप्त करून हा कारखाना सील केला होता. यानंतर २० एप्रिल २००७ मध्ये कारखाना पुन्हा सील केला. त्यानंतरही चंदन तस्करी चालूच कशी राहिली. त्यावेळी पोलिस कारवाई का झालेली नाही. झाली असेल तर आरोपींच्या हालचालीवर स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष कसे होते असा प्रश्न आहे.
पोलिसपथकातील शिलेदार : जिल्हापोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, सहाय्यक पोलिस अधीक्षक उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन कौसडीकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे, संजीव झाडे, हवालदार शंकर बांगर, विनोद साठे, अमृत खेडकर, बापू मोरे, विशाल पोरे, श्री दासरे, रियाज शेख, मिलिंद कांबळे, विठ्ठल पठाडे, सिकंदर मुल्ला, मंगेश बोधले, विजय कोरे, महादेव शिंदे, सैफन मुल्ला अश्पाक मियाँवाले हे पथकात सहभागी होते. पथकाकडून शुक्रवारी दुपारपर्यंत ही कारवाई सुरू होती. अटकेतील संशयित आरोपी गंगाराम पात्रे, देवेंद्र बनसोडे (रा. दोघे सदलापूर, अक्कलकोट), नागू हुसमनी (इंडी), गंगाराम तांबे, परशुराम नाईकवाडी, विठ्ठल वाली, हणमंत पुजारी, शिवानंद नांदगी, लायप्पा कांबळे, काशिनाथ साळुंखे, प्रकाश रावडी, सिध्दू नाईकवाडी, मल्लिकार्जुन मलवी, (सर्व इंडी), गुरुसिध्दप्पा बिराजदार (उपसरपंच, टाकळी), मल्लिकार्जुन बिराजदार (टाकळी), श्रीधर बंकलगी (मंगळूर), शिवराज मठपती (संगोळगी, इंडी), लिंगराज राठोड (बेलाटी), रफिक शेख (संगोळगी), गोविंद कैकाडी, भीमाशंकर कैकाडी (सादेपूर), अप्पासाहेब केंगार (सातनदुधनी), मल्लप्पा बगले (तडवळ).
धूमठोकलेले संशयित आरोपी : चंदनकारखाना मालक बशीर एन. महमद कुची, नवाज दस्तगीर हजी, हरिष उर्झ राजू गौडा (रा. तिघेही कासरगोड, केरळ).

२७५ पोती चंदन, २० लिटर तेल
तळघरातसापडले १०४ पोती चंदन, २० लिटर तेल १६ बाय ११ मीटर जागेतील या कारखान्यात १७१ पोती चंदन आढळले. तळघरातील दोन खोल्यांत १०४ पोती चंदन मिळाले. एकूण २७५ पोती चंदन सापडले. त्याचे वजन सहा हजार ३२० किलो असून बाजारभावानुसार त्याची किंमत तीन कोटी १६ लाख रुपये आहे. तसेच २० लिटर तेल मिळाले असून ते तपासणीसाठी वन विभागाकडे दिले.
बातम्या आणखी आहेत...