आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील नोकर भरतीची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर, कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकर भरतीची शासन नियुक्त उच्चस्तरीय चौकशी समितीकडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणातील सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत मुंबईला पाठवण्याचे समितीने सूचीत केले आहे. त्यानुसार सुमारे 90 हजार कागदपत्रांच्या छायांकित प्रती येत्या सोमवारपर्यंत खास वाहनाद्वारे रवाना होतील. यासाठी विद्यापीठाला सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च सोसावा लागणार आहे.

सोलापूर विद्यापीठातील नोकर भरतीच्या चौकशीसाठी उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव डॉ. अभय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाचे संचालक पी. आर. गायकवाड व कोल्हापूर सहसंचालिका र्शीमती निळेकर यांचाही समितीमध्ये समावेश आहे. समितीने विद्यापीठाला पाठवलेल्या पत्रात नोव्हेंबर 2011 ते जुलै 2012 पर्यंतच्या नोकर भरतीसंदर्भातील सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत मुंबई विभागाकडे पाठवण्याची सूचना केली आहे. डॉ. बंडगर, सोनजे यांच्या कार्यकाळातील सर्वच भरती संशयाच्या भोवर्‍यात आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल होत्या. उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या तक्रारींची दखल घेऊन प्रथम मार्च ते जुलै 2012 या काळातील भरतीस स्थगिती दिली. या काळात 12 कर्मचारी नियुक्त झाले होते. त्यानंतर चौकशी समितीस नोव्हेंबर 2011 पासून जुलै 2012 पर्यंतच्या सर्व भरती प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात वर्ग एक व दोनचे 16 तर वर्ग तीन व वर्ग चारमधील 60 कर्मचारी भरती झाले आहेत. असे एकूण 76 पदांसाठी सात ते आठ हजार अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाले होते. ते सर्व अर्ज, त्यांना जोडण्यात आलेली कागदपत्रे, विद्यापीठाची कागदपत्रे अशी एकूण 90 हजार कागदपत्रे आहेत. त्यांची छायांकित प्रत काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विद्यापीठात तत्कालीन कार्यकाळात झालेल्या भरतीप्रकरणी नियुक्त चौकशी समितीने विद्यापीठाला कळवल्याप्रमाणे त्यांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ
विद्यापीठात झालेल्या भरती घोटाळ्यात दोषींवर कारवाई करण्यात यावी. चौकशी समितीच्या अहवालात सत्य सामोरे येणार आहेच. प्रा. नामदेव गरड, माजी व्यवस्थापन समिती सदस्य