आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबीचिंचोळी येथील ९११ वर्षे जुन्या शिलालेखावर संशोधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ११व्या शतकात भूमिदानासाठी प्रसिद्ध असलेल्या सहाव्या विक्रमादित्याचा महत्त्वपूर्ण शिलालेख लिंबीचिंचोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे सापडला आहे. इतिहास संशोधक आनंद कुंभार यांनी "दिव्य मराठी'च्या मदतीने त्यावर नुकतेच संशोधन केले. या शिलालेखातून नवा ऐतिहासिक दुवा समोर आला आहे. सहाव्या विक्रमादित्याचा राज्यकारभार बिदर जिल्ह्यातील कल्याण म्हणजेच सध्याच्या बसवकल्याण येथून चालायचा. कर्नाटक, आंध्र प्रदेश, मराठवाडा, नागपूर या भागात त्याचे शिलालेख सापडले आहेत. लिंबीचिंचोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील मारुतीच्या मूर्तीमागे शिलालेख असल्याची माहिती आनंद कुंभार यांना ४० वर्षांपूर्वी मिळाली होती. तो शिलालेख वाचावयास मिळावा, यासाठी प्रयत्नही केलेे पण काही अडचणींमुळे त्यावर संशोधन पूर्ण झाले नव्हते, असे कुंभार यांनी सांगितले. "दिव्य मराठी' आणि लिंबीचिंचोळी पंचकमिटीच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.

अणदूर नाव पुढे आले
विक्रमादित्य नित्य भूमिदान करीत असे. इसवीसन १०७६ ते ११२७ हा त्याचा कार्यकाल असून, जवळजवळ ५० वर्षे त्याने राज्य केले. आजवर अनेक शिलालेख सापडले असले तरी या शिलालेखावरून त्याचे साम्राज्यात अणंदूर मुन्नूर म्हणजे ३०० गावांची राजकीय व्यवस्था अणदूरहून चालायची हे समोर आले आहे.'' डॉ.श्रीनिवास रित्ती, माजी विभागप्रमुख, प्राचीन भारतीय इतिहास आणि पुराभिलेख विभाग, धारवाड

साम्राज्य कक्षाची माहिती
इतिहासात अनेक विक्रमादित्य होऊन गेले पण हा चालुक्य राजघराण्यातील सहावा राजा होता. त्या घराण्यात सर्वात जास्त काळ यांचीच सत्ता होती. आजपर्यंतच्या शिलालेखातून १६ राण्यांची माहिती मिळते. त्या सर्वगुणसंपन्न असून महाराणी चंदलदेवी हीस त्याने स्वयंवरात जिंकले होते. बसवेश्वरांच्या काळात बिज्जलराजा हा त्यांच्या मुलीचा मुलगा म्हणजे नातू, आवडता नातू. या शिलालेखावरून त्यांच्या साम्राज्यकक्षांची माहिती उजेडात आली आहे.'' आनंद कुंभार, ज्येष्ठ इतिहास संशोधक

नवे संदर्भ उजेडात : ११०४मध्ये हा शिलालेख कोरला आहे. त्यातून सहाव्या विक्रमादित्याचे सोलापूर जिल्ह्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध उजेडात. तुळजापूर तालुक्यातील अणदूर हा प्रादेशिक कारभाराचा विभाग होता. अणदूरला जोडलेल्या ३०० गावांमधील लिंबीचिंचोळी या गावात त्याने श्री बिज्जेश्वर देवालयासाठी सेनाधिपती दंडनायकाची नेमणूक केली होती. ती करताना त्याने देणगी स्वरूपात प्रचंड दानही दिले होते.
बातम्या आणखी आहेत...